राजकीय
कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या आजच्या सभेची जय्यत तयारी
By nisha patil - 11/15/2024 11:02:11 PM
Share This News:
कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या आजच्या सभेची जय्यत तयारी
कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आज शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता गांधी मैदान येथे ‘महाराष्ट्र स्वाभिमान’ सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान येथे भेट देऊन सभेच्या नियोजना संदर्भात पाहणी केली.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची तोफ प्रथमच कोल्हापुरात धडाडणार आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मंडळी तसेच जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार या सभेला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेससह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते ही सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
या सभेच्या नियोजना संदर्भात आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी गांधी मैदान येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी करून चर्चा केली. सभेला येणाऱ्यांची बैठक व्यवस्था, मंडप उभारणी, सभेच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था याची माहिती घेऊन नियोजना संदर्भात सूचना केल्या.
प्रियांका गांधी यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांना नवी उर्जा मिळणार असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ही सभा यशस्वी करण्याचे आवाहन आ. सतेज पाटील यांनी यावेळी केले.
कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या आजच्या सभेची जय्यत तयारी
|