बातम्या

ईडीकडून सुजित पाटकरांना अटक

Sujit Patkar arrested by ED


By nisha patil - 7/20/2023 6:41:14 PM
Share This News:



ईडीकडून सुजित पाटकरांना अटक 

कोव्हिड घोटाळा प्रकरणी शिवसेना  नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले सुजित पाटकर यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून  काल रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यामुळे हा संजय राऊत यांच्यासाठी खूप मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. यापूर्वी अनेकदा सुजीत पाटकर यांची चौकशी ईडीकडून करण्यात आली होती. पण आता याच प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे.साधारण एक महिन्यापूर्वी ईडीने मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी केली होती. ज्यामध्ये शिवसेना  पक्षाचे सचिव सूरज चव्हाण यांची देखील चौकशी झाली होती. त्याचबरोबर सुजीत पाटकर यांची देखील चौकशी झाली होती. त्यावेळेस अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल यांची देखील चौकशी झाली होती. महापालिकेतील खरेदी विभागातील अनेक अधिकाऱ्यांचीही चौकशी झाली होती. काही कंत्राटदारांची देखील चौकशी करण्यात आली होती.

त्याच प्रकरणात सुजित पाटकर यांना अटक करण्यात आली. याआधी सुजित पाटकर यांची ईडीने दोनदा चौकशी केली होती. आता ईडीकडून ही कारवाई अधिक तीव्र होताना दिसत आहे.सध्या भाजप आणि  महाविकास आघाडी यांच्यात खूप आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा अनेकदा आरोप हा विरोधकांकडून सत्ताधारी भाजपवर केला जात आहे.

आता सुजित पाटकर च्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू झाली आहे की, दोनच दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांचे काही आक्षेपार्ह व्हिडीओ हे समोर आले होते. त्याच प्रकरणाला काउंटर करण्यासाठी सुजित पाटकरांवर कारवाई तर करण्यात आलेली नाही ना? असा सवाल आता विरोधक विचारत आहेत.भाजप नेते किरीट सोमय्यांनी काही महिन्यांपूर्वी आरोप केला होता की, सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे फ्रंटमॅन आहेत. तर त्यांच्या या आरोपाला खुद्द संजय राऊत यांनी उत्तर देताना म्हटलं होतं की, सुजीत पाटकर आणि इतरांची जी नावं घेतली जात आहेत ते माझे फक्त मित्र आहेत आणि मी ते कधीही नाकारत नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सुजित पाटकर म्हणाले होते की, ‘मी संजय राऊत यांना ओळखतो. ते माझ्यासाठी कौटुंबिक मित्राप्रमाणे आहेत. पण मी त्यांच्यासोबत कोणत्याही व्यवसायात भागीदार नाही किंवा आमचे कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत.’

‘प्रविण राऊत यांना मी माझ्या पहिल्या पत्नीमुळे ओळखतो. या व्यतिरिक्त माझे आणि प्रविण राऊत यांचे काहीही संबंध नाहीत. तसंच मी कधीही त्यांच्यासाठी कामंही केलेलं नाही.’


ईडीकडून सुजित पाटकरांना अटक