बातम्या

सुळकुड सहकारी पतसंस्थेने गोरगरिबांची पत निर्माण केली

Sulkud Cooperative Credit Institution created credit for the poor


By nisha patil - 2/10/2023 12:02:06 AM
Share This News:



 सुळकुड ता. कागल येथील सुळकुड ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने गोरगरिबांची पत निर्माण केली, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ केले. पतसंस्थेच्यावतीने आयोजित सभासदांना भेटवस्तू वितरण कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते.
           
भाषणात मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, सुळकुड पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब चवई यांनी  शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रातही चांगली कामगिरी केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून सहकारातही त्यांनी विश्वासार्हता निर्माण केली आहे.
             
मसोबा मंदिरासाठी एक कोटींचा निधी.......
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या गावाचे ग्रामदैवत श्री. मसोबा देवाची ख्याती जागृत देवस्थान अशी आहे. या देवालयाचा समावेश ब वर्ग यात्रास्थळात करून एक कोटीचा निधी देऊ. तसेच, गावाला जोडणारे उर्वरित रस्तेही चांगले करून देऊ.
            
अध्यक्ष स्थानावरून बोलताना गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील म्हणाले, सुळकुड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेने सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. सभासदांच्या पाठबळावरच या संस्थेने अनेक टप्पे पूर्ण केलेले आहेत.
            
पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गवई म्हणाले, सुळकुड सहकारी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सभासदांच्या खंबीर पाठबळावरच सुरू आहे. २९ वर्षापूर्वी २,४०० रुपये भाग भांडवलावर सुरू केलेली ही संस्था आज  २४ लाख भाग भांडवलाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. १३ कोटी ठेवी तर सहा कोटींची कर्जे आहेत. दहा कोटी गुंतवणूक असून दरवर्षी सभासदांना पंधरा टक्के डिव्हिडंट दिला जातो.
          
गावातील कु. मृणाली महादेव कोरे यांनी होमिओपॅथीमधील एम. डी ही पदवी मिळविल्याबद्दल त्यांचा सत्कार मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
           
व्यासपीठावर सरपंच सौ. सुप्रिया भोसले, संस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव कोरे, तात्यासाहेब वाणी, बापूसाहेब पाटील, युवराज पाटील, डॉ. अरुण मुदाण्णा, किरण पास्ते, शिवाजी लगारे, मॅनेजर सुरेश कांबळे, संचालक मंडळातील नरहर माळी, सत्याप्पा पाटील, किरण शिंगे, प्रकाश डोणे, महादेव कुंभार,  सौ. गीता सरदार, सौ. सुनीता चव्हाण, श्रीमती सिंधुताई कांबळे, बाळासाहेब हेगाजे, एस. के. पाटील, विलास जाधव आदी प्रमुख उपस्थित होते. स्वागत सत्यप्पा पाटील यांनी केले. प्रास्ताविक सौ. वैशाली बाळासाहेब म-याप्पा पाटील यांनी केले.

 

सुळकुड ता. कागल येथील सुळकुड ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात बोलताना वैद्यकीय शिक्षण व विशेष साहेब मंत्री हसन मुश्रीफ. यावेळी व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, सरपंच सौ. सुप्रिया भोसले, संस्थापक अध्यक्ष दादासाहेब चवई व प्रमुख मान्यवर.


सुळकुड सहकारी पतसंस्थेने गोरगरिबांची पत निर्माण केली