बातम्या
प्रकाशाच्या उत्सवात घ्या वीज सुरक्षेची काळजी – महावितरण
By nisha patil - 10/28/2024 10:23:14 PM
Share This News:
प्रकाशाच्या उत्सवात घ्या वीज सुरक्षेची काळजी – महावितरण
डीपीजवळ कचरा टाकू नका, फटाकेही सुरक्षित अंतरावर फोडा
कोल्हापूर/सांगली दि. 28 ऑक्टोबर २०२४:- दिवाळीत सार्वजनिक वीज यंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी सण साजरा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
महावितरणची वीज यंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीज वाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीज यंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीज पुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२- ३४३५ , १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचबरोबर नजीकच्या महावितरण कार्यालयाला संपर्क सुरु साधावा.
प्रकाशाच्या उत्सवात सुरक्षेला प्राधान्य द्या - मुख्य अभियंता स्वप्नील काटकर
प्रकाशाचा उत्सव साजरा करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून देखील सावध राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत माळेची वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाश कंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळत सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले आहे.
आकाश कंदील लावताना घ्या काळजी
आकाश कंदील किंवा दिव्यांच्या विद्युत माळेसाठी श्री पिनचा वापर न करता वायर्स थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या साह्याने खोचले जातात. त्यामुळे त्या प्लगमध्ये स्पार्किंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंध असावी व इतर बाबतीत काळजी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
प्रकाशाच्या उत्सवात घ्या वीज सुरक्षेची काळजी – महावितरण
|