बातम्या
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या : श्री.राजेश क्षीरसागर
By nisha patil - 7/26/2023 5:52:39 PM
Share This News:
कोल्हापूर दि.२६ : सन २०१९ आणि २०२१ ची महाभयंकर पूरस्थितीचा अनुभव पाहता यंदा प्रशासनाने योग्य पद्धतीने नियोजनातून परिस्थिती हाताळली आहे. पूरस्थितीबाबत नागरिकही सतर्क आहेत. संभाव्य पूरस्थिती उद्भवून नागरिकांचे नुकसान होवू नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क आहेच. पण, प्रशासनासह नागरिकांनी सतर्कता बाळगावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून संभाव्य पूरग्रस्त भागातील नागरिकांनी स्थलांतरीत व्हावे, प्रशासनाने त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय टाळावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी प्रशासनास दिल्या. कोल्हापूर शहरातील संभाव्य पूरग्रस्त भागाची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकार्यांन सोबत पाहणी केली.
श्री.राजेश क्षीरसागर यांनी सकाळी जामदार क्लब, शुक्रवार पेठ, शाहूपुरी कुंभार गल्ली, शाहूपुरी ६ वी गल्ली, विल्सन पूल, बापट कॅम्प आदी भागाची पाहणी केली. याठिकाणी नागरिकांशी संवाद साधून स्थलांतरीत होण्याबाबत आवाहन केले. प्रशासनानेही नागरिकांना आवश्यक मदत करण्याच्या सूचना दिल्या. यासह ठिकठिकाणी औषध फवारणी, वैद्यकीय शिबीर, स्थलांतर केलेल्या नागरिकांसाठी निवारा केंद्र, अल्पोपहारासह जेवणाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी माहिती देताना अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी, जामदार क्लब परिसरातील आठ कुटुंबांचे, सुतार वाडा येथील तेरा कुटुंबांचे स्थलांतरण झाले आहे. संभाव्य परिस्थिती पाहता पाण्याच्या पातळीप्रमाणे संभाव्य पूरस्थिती भागातील नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांच्यासाठी के.एम.सी.कॉलेज, जुने विवेकानंद कॉलेज, चित्रदुर्ग मठ आदी ठिकाणी निवारा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. त्यांच्याकरिता दररोज अल्पोपहार, जेवणाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती दिली.
यावेळी सूचना देताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधांचा दर्जा उत्तम ठेवा. पूरस्थिती काळात निर्माण होणारी रोगराई पाहता कचरा उठावाचे काम नियोजनबद्ध झाले पाहिजे. रोगाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी पूर ओसरल्यानंतर सदर भागात औषध फवारणी करण्यात यावी. यासह शहरातील प्रत्येक प्रभागात महानगरपालिका प्रशासनाकडून आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. शाहूपुरी, बापट कॅम्प आदी भागातील कुंभार बांधवांच्या गणेशमूर्ती स्थलांतरीत करण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी त्याकरिता आवश्यक यंत्रणाही देण्याचा प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.
यासह नागरिकांशी संवाद साधताना, कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील पूरस्थितीचा सामना करण्यास शासन सज्ज आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडले आहेत पण पाण्याचा विसर्गही त्याच प्रमाणात होत आहे. त्यामुळे इशारा पातळी पेक्षा कमी अधिक प्रमाणात पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत नागरीवस्तीमध्ये पाणी येण्याची शक्यता नाही. परंतु, नागरिकांनी गाफील न राहता आणि घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून वेळीच स्थलांतरीत व्हावे. प्रशासनासह शिवसैनिक संभाव्य पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचे सांगितले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उप-आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रविकांत आडसूळ, जलअभियंता नेत्रदिप सरनोबत, अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, आरोग्य निरीक्षक विजय पाटील, शिवसेनेचे माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, माजी नगरसेवक राजू हुंबे, शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, रमेश खाडे, शहरसमन्वयक सुनील जाधव, जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर, निलेश हंकारे, रियाज बागवान, राकेश पोवार, कपिल नाळे, अर्जुन आंबी, उमेश जाधव, धैर्यशील जाधव, रुपेश इंगवले, अमर क्षीरसागर, विनय वाणी, अभिजित कुंभार, काका निगवेकर, प्रथमेश निगवेकर, प्रशांत नलवडे, सुजय संकपाळ, अभिजित काशीद आदी शिवसेना पदाधिकारी आणि कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्या : श्री.राजेश क्षीरसागर
|