बातम्या

उन्ह्याळात डोळ्यांची ‘अशी’ काळजी घ्या

Take care of your eyes in summer


By nisha patil - 3/15/2024 7:21:32 AM
Share This News:



वसंत ऋतुमध्ये झाडांची पानगळ सुरू होते. हळूहळू उन्हाचा कडाका सुरू होतो आणि डोळ्यांच्या तक्रारींनाही सुरुवात होते. म्हणून उन्हाळ्यात डोळ्याची निगा राखणेही गरजेचे आहे.

उन्हाळ्यामुळे डोळ्यांना उद्भवणारे आजार –
उष्णता वाढल्यामुळे डोळे कोरडे पडू लागतात. डोळ्यांची आग होणे, डोळ्यांना टोचणे, पाणी येणे, असे त्रास त्यामुळे होऊ लागतात.
डोळे येणे, चिकट होणे, जळजळ होणे, आग होणे, अशा प्रकारचे डोळ्यांचे आजार शक्यतो उन्हाळ्यात उद्भवतात. उन्हाळ्यात प्रामुख्याने डोळ्यांना त्रास होणाऱ्या अतिनील किरणांमुळे पारदर्शक पटलास व नेत्रपटलास इजा होते. पारदर्शक पटलास होणाऱ्या इजेस फोटोकेराटिटिस असे म्हणतात. यामध्ये डोळा दुखणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळा लाल होणे, अशा समस्या प्रामुख्याने जाणवतात.

अतिनील किरणांमुळे मोतीबिंदू म्हणजे डोळ्यावर पांढरा पडदा येण्यासारखी समस्या उद्भवू शकते. विशेषत: चार ते दहा वर्षे वयोगटातील मुलांना उन्हाळ्याचा जास्त त्रास होतो. यामध्ये डोळ्यांना खूप खाज येते. डोळे लाल होतात. डोळ्यातून पाणी येते. तसेच, डोळ्यातून पांढरा दोरीसारखा व्हाईट रापी डिस्चार्ज येणे, या तक्रारी प्रामुख्याने जाणवतात.घरगुती उपायांनी डोळ्यांची अशी घ्या काळजी –
डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून तातडीने उपचार करून घेणे आवश्यक आहे. मात्र डोळ्यांच्या तक्रारी सुरु होऊ नये म्हणून डोळ्यांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपायही करता येतात.

वाढत्या उन्हामुळे डोळ्याचा त्रास कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे व थंड पाण्याने डोळे दिवसातून ४-५ वेळा स्वच्छ करावेत. लिंबू, कोकम, गुलकंद, वाळा सरबत आदी पित्तनाशक पेये जास्त घेणे अपेक्षित आहे. उन्हाळ्यात उष्ण, तेलकट, तिखट पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.

दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नये. उन्हामध्ये घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी किंवा रुमाल, स्कार्प वापरणे, यूव्ही-ए व यूव्ही-बी या दोन्हीही किरणांपासून ९९-१०० टक्केसंरक्षण करणारे आणि डोळे पूर्ण कव्हर करणारे सनग्लास वापरणे गरजेचे आहे. यूव्ही- किरणांपासून संरक्षण करणाऱ्या कॉन्टॅक्ट लेन्ससुद्धा उपलब्ध आहेत. सनग्लास व कॉन्टॅक्ट लेन्स दोन्ही एकदम वापरणे योग्य ठरते.

डोळ्यांची काळजी घेण्यासाठीच्या उपायांबरोबर आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, पपई, गाजर, तसेच ताज्या फळांचा रस यांचाही समावेश करावा म्हणजे डोळे निरोगी राहण्यासाठी मोठी मदत होईल.


उन्ह्याळात डोळ्यांची ‘अशी’ काळजी घ्या