बातम्या

तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले; ११०० क्युसेक वेगाने विसर्ग : अखेर मुंबईकरांची चिंता मिटली

Tansa Dam filled to capacity


By nisha patil - 7/26/2023 5:56:24 PM
Share This News:



तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले; ११०० क्युसेक वेगाने विसर्ग : अखेर मुंबईकरांची चिंता मिटली

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं ठाण्यातील तानसा धरण ओव्हरफ्लो झालं आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ठाण्यासह उपनगरांच्या परिसरात होत असलेल्या पावसामुळं तानसा धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती समोर आली आहे. शहापूर तालुक्यातल्या तानसा धरण बुधवारी पहाटे चाडेचार वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरलं असून त्यानंतर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून ११०० क्यूसेक इतक्या वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यानंतर आता तानसा धरण परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय धरण परिसरात व नदीत धोकादायक ठिकाणी न जाण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
 

ठाण्याच्या ग्रामीण भागात असलेल्या तानसा धरणातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करण्यात येत असतो. धरणाची क्षमता सात टीएमसी इतकी असून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. त्यामुळं तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातून ११०० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळं आता मुंबईकरांच्या पाण्याची चिंता सध्या तरी मिटलेली आहे. याशिवाय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अन्य धरणांमध्येही पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता मुंबईच्या अनेक भागातील नागरिकांना पाणीकपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.तानसा धरण भरल्याने सद्यस्थितीत धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे. त्यामुळं नदीला पूर आला असून प्रशासनाने ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि पालघर जिल्ह्यातील वसई या तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. तसेच महसूल व पोलीस प्रशासनाने दक्षता बाळगण्याचं आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडून करण्यात आलं आहे.


तानसा धरण पूर्ण क्षमतेने भरले; ११०० क्युसेक वेगाने विसर्ग : अखेर मुंबईकरांची चिंता मिटली