बातम्या
प्रशासनाकडून ४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण
By Administrator - 5/29/2024 10:59:58 AM
Share This News:
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी ४ जून रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार असून यासाठी प्रशासनाने प्राथमिक तयारी पूर्ण केली आहे, इतर तात्पुरत्या भौतिक सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आहे. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय धान्य गोडाऊन, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर येथे आणि ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय गोदाम इमारत , राजाराम तलाव जवळ कोल्हापूर येथे पार पडणार असून तयारीबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दोन्ही ठिकाणी सोमवारी भेट देवून आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतमोजणी कक्षातील टेबलची रचना, उमेदवार प्रतिनिधी आसन व्यवस्था, सीसीटीव्ही, सुरक्षा व्यवस्था, मतमोजणी ठिकाणी येण्या-जाण्याचे मार्ग आदी विषयांबाबत पाहणी करून कामाबाबत आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हाकणंगले लोकसभा मतदारसंघ संजय शिंदे, उप जिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी उपस्थित होते.
मतमोजणीसाठी ६८६ कर्मचारी नियुक्त, बाराशेहून अधिक पोलिसांची सुरक्षा
निवडणुकीचा निकाल शांततेत व वेळेवर लागण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. पोस्टलची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरू होईल. ईव्हीएमवरील मतमोजणी सकाळी ८.३० वाजता सुरू होईल. ४७ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी साठी ३४९ तर ४८ हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी साठी ३३७ कर्मचारी असे मिळून एकुण ६८६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. याव्यतिकरीक्त अतिरीक्त १० टक्के कर्मचारी दोन्ही ठिकाणी राखीव असणार आहेत. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ६००-६०० पोलीस कर्मचारी सुरक्षेच्या दृष्टीने तैनात करण्यात येणार आहेत.
टेबल संख्या आणि मतमोजणी फेऱ्या
४७ कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबल संख्या असून चंदगड २८, राधानगरी ३१, कागल २६, कोल्हापूर दक्षिण २४, करवीर २६ आणि कोल्हापूर उत्तरची २३ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. ४८ हातकणंगलेसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबल संख्या असून शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी २४, इचलकरंजी १९, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी २१ तर शिरोळसाठी २४ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण होणार आहे. प्रत्येक टेबलसाठी प्रत्येकी एक मतमोजणी प्रतिनिधी राहणार आहे़ टपाली मतमोजणीसाठी स्वतंत्र मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त केला आहे. ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सूचनांनुसार प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी केंद्रावर मोबाईल, कॅमेरा, ऑडिओ व्हीडीओ रेकॉर्डर- पेन, आदी कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई आहे.
मतमोजणी टेबलची रचना
1. एक मतमोजणी पर्यवेक्षक
2. एक मतमोजणी सहाय्यक
3.एक शिपाई
4. एक सूक्ष्म निरीक्षक
मतमोजणीच्या ठिकाणी अशा असणार सुविधा
मोठा पक्क्या बांधणीचा मतमोजणी कक्ष तयार करण्यात आला आहे. याठिकाणी मतमोजणी अधिकारी, कर्मचारी, निवडणूक निर्णय अधिकारी, निरीक्षक, उमेदवार व निवडणूक / मतमोजणी प्रतिनिधी यांच्यासाठी बसण्यासाठी व्यवस्था, पुरेसा वीज पुरवठा व जनरेटर बॅकअप, दूरध्वनी, इंटरनेट सुविधा असणार आहे. संपुर्ण सुरक्षा व्यवस्था, आग प्रतिबंधक सुविधा यंत्रणा, पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, भोजन व्यवस्था करण्यात येत आहे. स्वच्छतागृह, प्राथमिक वैद्यकीय सेवा असणार आहेत.
प्रशासनाकडून ४ जून रोजी होणाऱ्या लोकसभा मतमोजणीसाठीची तयारी पूर्ण
|