बातम्या
अंबाबाई मंदिरातील नगाराखान्याचे सौंदर्य फुलणार
By nisha patil - 8/7/2024 11:51:30 AM
Share This News:
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील नगारखान्याच्या इमारतीचे सौंदर्य आणखी खुलणार आहे. या नगारखान्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 18 महिन्यांत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.यासाठी 3 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर आहे.
अंबाबाई मंदिरातील गरुड मंडपातील लाकडी खांब खराब झाले. यामुळे हे खांब बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरुड मंडपाबरोबरच नगारखान्याची इमारत आणि मनकर्णिका कुंडाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. याकरिता देवस्थान समिती 21 कोटी 68 लाख 26 हजार 794 रुपये खर्च करणार आहे. समितीच्या या प्रस्तावाला राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने दि.15 मार्च रोजी मान्यता दिली आहे. ही सर्व कामे राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत.
गरुड मंडपासाठी आवश्यक सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातून आणण्यात आले आहे. टेंबलाईवाडी येथे या लाकडावरील कलाकुसरीचे काम करून गरुड मंडपाचे खांब तयार करण्यासाठी तसेच मनकर्णिका कुंडासाठी दगड घडवण्यासाठी कार्यशाळा कार्यरत करण्यात आली आहे. दगड घडवून झाल्यानंतर ते प्रत्यक्ष बसविण्याचे काम लवकरच सुरू होईल. मात्र, गरुड मंडपाचे खांब तयार झाले, तरी ते प्रत्यक्ष मंडपात बसविण्याचे काम आक्टोबर महिन्यानंतरच केले जाणार आहे.मंदिरातील नगारखाना इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या या नगारखान्यावरील कौले काढून घेतली जात आहेत. दुरुस्तीसह अन्य भागही काढून घेतला जाणार आहे. यानंतर नगारखान्याच्या सुटलेल्या लाकडी नक्षीकामाच्या कोनाड्यांची नव्याने जोडणी केली जाणार आहे. सध्या ही नक्षी सुटल्याने धोकादायक बनली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नगारखान्याचे सौंदर्य आणखी खुलणार आहे.
अंबाबाई मंदिरातील नगाराखान्याचे सौंदर्य फुलणार
|