बातम्या
करवीर तहसीलदार कार्यालयाबाहेरचा बोर्ड होतोय व्हायरल
By nisha patil - 1/9/2023 5:42:21 PM
Share This News:
एकीकडे भारतीय जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करत असतात आणि दुसरीकडे त्यांच्या कुटुंबीयांना साध्या साध्या गोष्टींसाठी झगडावे लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. घरचा कर्ता पुरूष लष्करात असल्याने सरकारी कागदपत्रांची इतर कामं त्यांच्या कुटुंबातील वृद्धांना किंवा महिलांना करावी लागतात. पण सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी काही रित आपल्याकडे कायमच दिसते. त्यामुळे साध्या साध्या कामांसाठी त्यांना सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. आपला पोरगा लष्करामध्ये नोकरी करतोय आणि आपली इकड आपली कायदेशीर कामंही वेळेत पूर्ण होत नाहीत अशी काहीशी खंतही त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात असते. अशा वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीरचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी एक आदर्शवत पाऊल उचललं आहे. लष्करातील जवान वा त्यांच्या कुटुंबीयांचे काही काम असेल तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा, त्याचे काम प्राधान्याने करणे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचं त्यांनी सांगितलंय. तशा आशयाचा एक बोर्डच त्यांनी आपल्या कार्यालयाच्या बाहेर लावला आहे.
कोल्हापुरातल्या करवीर तहसीलदारांनी पुढाकार घेत लष्करात नोकरी करणाऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचं काम केलं आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या कोणत्याही जवानाचं वा त्यांच्या कुटुंबीयांचे तहसीलदार कार्यालयात काही काम असेल तर त्यांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन करवीरचे तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केलं आहे. करवीरच्या तहसीलदारांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर जो बोर्ड लावला आहे तो सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.
करवीर तहसीलदार कार्यालयाबाहेरचा बोर्ड होतोय व्हायरल
|