विशेष बातम्या

महावितरणच्या क्रीडास्पर्धेत कुस्त्यांचा रंगला थरार

The colorful thrill of wrestling in the sports competition of Mahavitran


By nisha patil - 7/2/2025 7:32:24 PM
Share This News:



महावितरणच्या क्रीडास्पर्धेत कुस्त्यांचा रंगला थरार

पुणे-बारामतीला १० पैकी ६ सुवर्णपदके तर कोल्हापूरला २ सुवर्ण

बारामती, दि. ७ फेब्रुवारी २०२५: महावितरणमध्ये कार्यरत कुस्तीपटू कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध डावपेच अन् ताकदीचा अनोखा संगम सादर केल्याने कुस्तीप्रेमी प्रेक्षकांना थरार अनुभवता आला. या रंगलेल्या कुस्त्यांमध्ये पुणे-बारामती संघाच्या मल्लांनी ६ सुवर्ण तर कोल्हापूरच्या मल्लांनी २ सुवर्ण पदकांची कमाई केली. 

बारामती येथील विद्यानगरी प्रतिष्ठानच्या क्रीडा संकुलात सुरु असलेल्या महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील कुस्त्यांना मोठा प्रतिसाद मिळला. विविध वजनगटात झालेल्या या कुस्त्यांमध्ये महावितरणच्या कसलेल्या कुस्तीगिरांनी डाव-प्रतिडाव व ताकदीची चपळता दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली. यात राष्ट्रीय कुस्तिगीर अमोल गवळी यांच्या लढतीला विशेष प्रतिसाद मिळाला. कलाजंग, ढाक, मोळी, एकेरी पट, दुहेरी पट, धोबीपछाड अशा डावपेचांनी लडाईमध्ये चांगलाच थरार रंगला. पुणे बारामती संघातील कुस्तिगिरांनी वर्चस्व गाजवत १० पैकी तब्बल ६ तर कोल्हापूरने २ तसेच अकोला-अमरावती व मुख्यालय-भांडूप संघाने प्रत्येकी एक सुवर्ण पदक मिळवले. या कुस्त्यांच्या सामन्यांना पुणे प्रादेशिक संचालक  भुजंग खंदारे, मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, मुख्य महाव्यवस्थापक (मासं) भुषण कुलकर्णी, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके आदींसह कुस्तीप्रेमींची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. 

कुस्ती स्पर्धेमध्ये वजनगटनिहाय विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे - ५७ किलो- आत्माराम मुंडे (पुणे-बारामती) व संभाजी जाधव (कोल्हापूर), ६१ किलो- विनोद गायकवाड (अकोला-अमरावती) व शरद मोकाळे (संभाजीनगर-लातूर-नांदेड), ६५ किलो- राजकुमार काळे (पुणे-बारामती) व सुर्यकांत गायकवाड (नाशिक-जळगाव), ७० किलो- अनंत नागरगोजे (मुख्यालय-भांडूप) व युवराज निकम (कोल्हापूर), ७४ किलो- गुरुप्रसाद देसाई (कोल्हापूर) व जयकुमार तेलगावकर (संभाजीनगर-लातूर-नांदेड), ७९ किलो- अकील मुजावर (पुणे-बारामती) व जोतिबा ओंकार (कोल्हापूर), ८६ किलो- महावीर जाधव (पुणे-बारामती) व बेलराज अलाने (संभाजीनगर-लातूर-नांदेड), ९२ किलो- अमोल गवळी (पुणे-बारामती) व तुषार वारके (कोल्हापूर), ९७ किलो- महेश कोळी (पुणे-बारामती) व हणमंत कदम (कोल्हापूर), १२५ किलो- प्रमोद ढेरे (कोल्हापूर) व वैभव पवार (पुणे-बारामती).


महावितरणच्या क्रीडास्पर्धेत कुस्त्यांचा रंगला थरार
Total Views: 128