बातम्या
चक्क गर्लफ्रेंडसाठी पतीनेच कापले पत्नीचं नाक
By nisha patil - 3/7/2023 5:28:17 PM
Share This News:
गर्लफ्रेंडसाठी अगदी चंद्र, तारे आणणारे, एवढंच नाहीतर जीव देणारेही आपण पाहिले आहेत. पण एका प्रेमवेड्यानं गर्लफ्रेंडसाठी आपल्या पत्नीचं नाक कापलं आहे. बरं पत्नीचं कापलेलं नाक हा पठ्ठ्या खिशात ठेवून फरार झाला. पत्नीनं पतीची पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी फरार पतीला अटक केली आहे. बांसताली गावात राहणाऱ्या विक्रमचं लग्न काही वर्षांपूर्वी मोहम्मदाबाद गावात राहणाऱ्या सीमा देवीशी झालं होतं. लग्नानंतर दोघांना दोन गोंडस मुलंही झाली. पण याचदरम्यान विक्रमचं गावातील दुसऱ्या एका महिलेवर जीव जडला आणि तिथूनच सुरू झाला प्रेमाचा त्रिकोण. काही दिवस विक्रमचं प्रेम प्रकरण सुरू होतं, पण याची कुणकुण एक दिवस विक्रमची पत्नी सीमादेवीला लागली. तिनं याचा विरोध करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून विक्रम आणि सीमा देवी यांच्यात सातत्यानं खटके उडत होते.
पीडित पत्नीनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री जवळपास 8 च्या दरम्यान विक्रमनं सर्वात आधी जेवण बनवायला सांगितलं. तेव्हाच पती-पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली. तेवढ्यात विक्रमला राग अनावर झाला आणि त्यानं आपल्या लहान मुलीवर राग काढण्यास सुरुवात केली. सीमा देवीनं विक्रमला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या लहान मुलीला विक्रमच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात संतापलेल्या विक्रमनं एका धारधार हत्यारानं सीमा देवीचं नाकच कापलं. सीमादेवी रक्तबंबाळ झाली. विक्रमनं कापलेलं नाक खिशात ठेवलं आणि तो तिथून फरार झाला.
रक्तबंबाळ झालेली सीमा देवीनं त्याच परिस्थितीत पोलीस ठाणं गाठलं आणि पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत गुन्हा दाखल केला. पीडित पत्नी सीमा देवी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पती विक्रमविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी सीमा देवी यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. सध्या सीमा देवीवर उपचार सुरू आहेत.
चक्क गर्लफ्रेंडसाठी पतीनेच कापले पत्नीचं नाक
|