बातम्या

महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयातच पडून

The inflation allowance file has been lying in the ministry for two months


By nisha patil - 8/29/2023 7:54:58 PM
Share This News:



महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी आणि अधिकारी यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे गेली अनेक वर्ष महागाई भत्ता दिला जातो. एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात मुख्यमंत्र्यांनी त्याची उजळणीवजा घोषणा केली होती.  मात्र महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयात तशीच धूळ खात पडली असून  एसटी कर्मचाऱ्यांच्या  प्रश्नांवर राज्य सरकारची उदासीनताच  दिसून येते असा आरोप एसटी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. तसेच, एसटीच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभात करण्यात आलेली ही घोषणा हवेत विरून जाऊ नये, असंही बरगे यांनी म्हंटलं आहे. 

 मोठा गाजावाजा करत एसटी कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाप्रमाणं महागाई भत्ता दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केली होती. मात्र  अजूनही एकूण 8 टक्के थकीत महागाई भत्ता अद्याप मिळालेला नाही. महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयातच धूळ खात पडून  आहे, त्यामुळे  एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर हे सरकार संवेदनशील नसल्याचं वारंवार सिद्ध होत आहे, राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 42 टक्के महागाई भत्ता मिळत असून त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता मिळायला हवा होता. पण एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप 34 टक्के इतकाच महागाई भत्ता मिळत आहे, ही गंभीर बाब असल्याचंही बरगे म्हणाले आहेत.

      कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी, उपदान, अशी मिळून अंदाजे 800 कोटी रकमेचा निधी अद्यापही ट्रस्टकडे  निधी अभावी भरणा करण्यात आलेली नाही. . एसटीकडे निधीची कमतरता असल्यानं ही रक्कम सरकारकडून मिळावी यासाठी या भत्त्यातील पहिल्या टप्प्यातील 4 टक्के महागाई भत्ता देण्यासंदर्भातील प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच सरकारकडे पाठवण्यात आला आहे , मात्र अजूनही त्यावर निर्णय झालेला नाही.  थकीत 8 टक्के महागाई  भत्त्याच्या संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांचा नेहमी प्रमाणे अपेक्षाभंग होऊ नये असंही बरगे यांनी म्हटलं आहे.


महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयातच पडून