बातम्या
अवघ्या आठ तासांत लावला खुनाचा छडा
By nisha patil - 10/16/2023 8:10:13 PM
Share This News:
शेतकऱ्याच्या खुनाचा छडा लावण्यात कुरुंदवाड पोलिसाना यश.
शेतात चारा आणण्यासाठी गेलेल्या सुनिल भिमराव चव्हाण या शेतकर्याचा अज्ञाताने धारधार शस्त्राने हातावर व पायावर वार करुन खून केल्याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावला असून १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदरचा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे व सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मयत चव्हाण याचे अनवडी नदी कडेला शेती आहे. ते सायंकाळी पाचच्या सुमारास आपली घोडागाडी घेवून चारा आणण्यासाठी गेले होते. साडेपाचच्या सुमारास त्याचा मेव्हणा तेरवाडचे उपसरपंच जालिंदर सांडगे त्याच ठिकाणी चारा आणण्यासाठी गेले असता सुनिल रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडल्याचे त्यांना दिसले. सांडगे यांनी चव्हाण यांना नागरीकांच्या मदतीने जयसिंगपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र उपचारापूर्वीच ते मयत झाले होते.
दरम्यान या प्रकरणी कुरुंदवाड पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपास करून या प्रकरणातील संशयित राहूल किरण भबिरे ( रा. कुरुंदवाड) व पवन कित्तुरे यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता पूर्ववैमनस्यातून राहूल भबिरे यांने पवन कित्तुरे याच्या मदतीने ८ जणांना सांगून सुनिल चव्हाण यांच्यावर कट रचून कोयत्याच्या सहाय्याने वार करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी राहूल किरण भंबीरे (रा.कुरुंदवाड) पवन नागेश कित्तुरे (रा. परीट गल्ली कुरुंदवाड) , सागर अरविंद पवार (रा. विटा ता. खानापूर जि. सांगली), शहाजान अलाब्क्ष पठाण ( रा. कृष्णानगर गल्ली नं.4 इचलकरंजी), अनिकेत दत्तात्रय ढवणे (रा.कराड रोड शाहुनगर विटा ता. खानापूर जि.सांगली), तुषार तुकाराम भारंबल रा.कराड रोड शाहूनगर विटा, रोहन किरण जावीर रा. यशवंतनगर विटा, रितेश विकास खरात (रा. साई शंकर रोड महात्मा गांधी शाळेजवळ विटा, सोहन माणिक ठोकळे (रा. जुना वासुंबे रोड आदर्शनगर विटा व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना अटक करण्यात आली आहे.सागर पवार,रोहन जावीर आणि रितेश खरात हे तिघेही सांगली जिल्ह्यातून हद्दपार आहेत.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस, पोलिस उपनिरिक्षक सागर पवार यांच्यासह सर्व पोलिस कर्मचाऱ्यांनी केली. अवघ्या आठ तासांत लावला खुनाचा छडा लावल्यामुळे पोलिसांचे कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे
अवघ्या आठ तासांत लावला खुनाचा छडा
|