पर्यावरण समस्या सोडवण्याच्या उद्देशाने ठोस कार्य करण्याचा बैठकीत निर्धार

The meeting decided to take concrete action aimed at solving environmental problems


By nisha patil - 6/6/2023 5:32:50 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  इचलकरंजी शहराची जीवनदायिनी पंचगंगा अमृतवाहिनी करण्यासाठी व  जनआयोग नियुक्त करण्यासाठी पर्यावरण दिनानिमित्त समाजवादी प्रबोधिनी येथे प्रांताधिकरी मोसमी चौगुले-बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. पंधरा दिवसांपूर्वी जलपुरुष डॉ राजेंद्रसिंह राणा यांनी नदी, पर्यावरण समस्या सोडवणुकीसाठी जनआयोग नेमण्याची सूचना इचलकरंजीत पर्यावरण कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये केली होती. त्या अनुषंगाने समाजवादी प्रबोधिनी येथे कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेण्यात आली.पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी जनआयोग गठीत करण्यासाठी झालेल्या बैठकीत प्रदूषित घटकांचा शोध घेणे,कारणे शोधून उपाययोजना करणे,राज्य व केंद्र सरकारकडे नदी स्वास्थ टिकविण्यासाठी प्रयत्न करून पर्यावरण समस्या सोडवण्याच्या उद्देशाने ठोस कार्य करणे आणि हा विषय लोक चळवळीचा बनवणे आदी निर्णय घेण्यात आले.प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.त्यातून जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीच्या आयोजना मागील भूमिका मांडली.मंचावर अरविंद धरणगुत्तीकर,संदीप चोडणकर,अभिजीत पटवा,रवी जावळे उपस्थित होते

प्रांताधिकारी मौसमी चौगुले  मनोगत व्यक्त करताना इचलकरंजीमध्ये प्रदूषणमुक्तीचे कार्य अजून वाढलं गेलं पाहिजे. प्रत्येक घटकापर्यंत सदर गंभीर बाबीची तीव्रता समजली पाहिजे, पंचगंगा प्रदूषण मुक्त करणे हे प्रत्येक नागरिकांपर्यत जोपर्यत रुजत नाही तोपर्यत कार्यकर्त्यांनी थांबू नये.या वर्षाची जागतिक पर्यावरण दिनाची थीम प्लास्टिक प्रदूषणावर आहे. आपण आता निर्धारपूर्वक प्लॅस्टिक वापरा बरोबरच इतर हानिकारक सवयींना नकार दिला पाहिजे. उत्पादक कंपन्या खप वाढविण्यासाठी लहानमुलांना टार्गेट करत असतात, त्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक प्रदूषण वाढत असते,हे रोखण्यासाठी पर्यावरण रक्षणाचे बीज लहान वयात मुलांमध्ये पेरले गेले पाहिजे. त्यासाठी मी शाळांमधून काम करणार आहे. मुलांमध्ये पर्यावरण पूरक जीवनशैलीची जाणीव होण्याकरिता बाटलीबंद पाण्याला सुद्धा आपल्याला नकार देता आला पाहिजे हे स्पष्ट केले.
 नदीखोऱ्यांमध्ये पर्यावरण चळवळ रुजविली जात असेल तर प्रदूषण मुक्तीचा निर्धार करणार्यांना माझ्या कडून सर्वोतोपरी सहकार्य राहील. 

  पंचगंगेच्या समस्येवर बोलताना संदीप चोडणकर म्हणाले की केंद्रीय प्रदूषण मंडळाने जारी केलेल्या प्रदूषित नद्यांच्या सुचीमध्ये पंचगंगेचे नाव नाही हे आश्चर्यकारक आहे. इथे कावीळ नंतर पंचगंगेचे पाणी नाकारण्यात आले. आता तर जलपर्णीची वाढ होत आहे. तरीसुद्धा शासकीय पातळीवर नदी प्रदूषणाची गांभीर्यता नाही. म्हणून राजेंद्र सिंह राणांनी सांगितल्याप्रमाणे जन आयोग नेमून जन सुनावणी करणे गरजेचे आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितलेल्या पर्यावरणाची पंचसूत्री अवलंबून नदी अमृतवाहिनी करण्यासाठी जनरेटा उभा करणे आवश्यक आहे.
  
हा विषय इचलकरंजी शहराचा जिव्हाळ्याचा असल्याने इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने अभिजित पटवा यांनी मनोगतात पंचगंगा प्रदूषणामुक्तीसाठी विविध पातळ्यांवर काम करणे गरजेचे असून वस्त्रोद्योग टिकला पाहिजे व वस्त्रोद्योगातील घटकांनी नविन वस्त्रोद्योग धोरणानुसार पाणी शुद्धीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत व्यक्त केले.यावेळी विश्वास बालिघाटे, अरविंद धरणगुत्तीकर,सुनील बारवाडे, कॉ दत्ता माने, रिटा रॉड्रीग्ज, सुषमा साळुंखे, बजरंग लोणारी,राजन मुठाणे,अभिजित पटवा, शोभा इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी अभिमन्यू कुरणे, प्रा.रमेश लवटे,अन्वर पटेल,दयानंद लिपारे,अमितकुमार बियाणी,राजू कोन्नुर, सदा मलाबादे,उदयसिंह निंबाळकर ,अरुण दळवी,अनिता दळवी,यांच्यासह अनेकजण उपस्थीत होते.
 जन आयोगात काम करू इच्छिणाऱ्या आणि त्यासाठी वेळ देऊ शकणाऱ्या पर्यावरणप्रेमी व पंचगंगाप्रेमी नागरिकांनी इचलकरंजी पंचगंगा प्रदूषणमुक्ती समितीच्या अरविंद धरणगुत्तीकर( ९४२२८ ०२२२२),संदीप चोडणकर(९०११३ ०३९९९),अभिजित पटवा(९९२१६ ००८०० ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले .रवी जावळे यांनी आभार मानले.


पर्यावरण समस्या सोडवण्याच्या उद्देशाने ठोस कार्य करण्याचा बैठकीत निर्धार