बातम्या
नवदाम्पत्य बोहल्यावरुन थेट पंचगंगा जलपर्णीमुक्तीसाठी सरसावले
By nisha patil - 6/15/2023 6:18:52 PM
Share This News:
इचलकरंजी/प्रतिनिधी -एकच ध्यास जलपर्णीची र्हास या ध्येयाने इचलकरंजीची जीवनदायिनी पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी माणुसकी फौंडेशनची धडपड सुरु आहे. या सामाजिक कार्यात फौंडेशनचे सदस्य कृष्णा इंगळे हे आपल्या नववधुला घेऊन पंचगंगा जलपर्णीमुक्तीसाठी थेट पंचगंगा नदीत उतरले. अशाच पध्दतीने सर्वांनी मिळून एकमेकांच्या सहकार्याने हातभार लावल्यास पंचगंगा निश्चितपणे मोकळा श्वास घेईल.
उन्हाळा सुरु झाला की पंचगंगा नदीपात्र हे जलपर्णीच्या विळख्यात हरवून जाते. हे मागील काही वर्षांपासून नेहमीचेच चित्र झाले आहे. नानाविध प्रकारे जलपर्णी हटविण्याचा प्रयत्न केला जातो, पण त्याला संपूर्णत: यश येत नाही. यावर्षीही पंचगंगा नदीपात्रात मोठ्या जलपर्णी पसरल्याने पात्र आहे की हिरवळ हेच समजून येत नाही. इचलकरंजीची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी संपूर्ण जलपर्णीमुक्त करण्याच्या ध्येयाने सामाजिक कार्यात अग्रेसर माणुसकी फौंडेशन सरसावली आहे. फौंडेशनचे संस्थापक रविंद्र जावळे यांच्या नेतृत्त्वाखाली फौंडेशनचे सदस्य मागील तीन महिन्यांपासून झटत आहेत. इचलकरंजी महानगरपालिकेच्या सहकार्याने ‘एकच ध्यास जलपर्णीचा र्हास, मी उतरणार माझ्या पंचगंगा मातेसाठी, मी उतरणार माझ्या उद्याच्या पिढीसाठी’ ही संकल्पना घेऊन पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त करण्याचा निश्चय केला आहे.
याच दरम्यान माणुसकी फौंडेशनचे सदस्य कृष्णा इंगळे यांचा विवाह निश्चित झाला. 13 जून 2023 रोजी विवाह असल्यामुळे ते चार दिवस या मोहिमेत सहभागी होऊ शकले नव्हते. याची हुरहुर कृष्णा यांच्या मनात लागून राहिली होती. आणि अखेर विवाहविधी आटोपताच आपल्या नववधुला कृष्णा यांनी आपला मानस सांगितला. त्याला साथ देत शिवानीनेही होकार दिला. आणि थेट बोहल्यावरुन कृष्णा आणि सौ. शिवानी या नवदाम्पत्याने पंचगंगा नदीचे पात्र गाठले. नदीकाठावरील श्री वरदविनायकाचे दर्शन घेऊन दोघांनी जलपर्णी हटविण्याच्या कामात हातभार लावला. अशाच प्रकारे प्रत्येकाने मीसुध्दा सहभागी होणार असा निश्चय करुन हातभार लावल्यास पंचगंगा निश्चितपणे जलपर्णीमुक्त होईल यात शंका नाही.
नवदाम्पत्य बोहल्यावरुन थेट पंचगंगा जलपर्णीमुक्तीसाठी सरसावले
|