बातम्या
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न
By nisha patil - 6/29/2023 12:23:04 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : आज (29 जून) आषाढी एकादशी आहे. यानिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. या आषाढी वारीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.
बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे
मोठ्या उत्साहात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक विठ्ठल रक्मिणीची शासकीय महापुजा केली. यावेळी त्यांनी बळीराजाला कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे .. सुजलाम सुफलाम होऊ दे .. पाऊस पडू दे .. प्रत्येक राज्यातल्या माणसाला चांगले दिवस यावेत हे मागणं विठुरायाच्या चरणी केलं. तसेच मंदिरातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई आणि घर भत्ता मंजूर करण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या शासकीय महापूजेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश ख्याडे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे सीइओ दिलीप स्वामी, देवस्थान समितीचे सह अध्यक्ष गहिणीनाथ महाराज औसेकर महाराज यांच्यासह जिल्ह्यातील खासदार, आमदार अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
25 वर्षापासून अहमदनगरच्या काळे दाम्पत्याची वारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मानाचा वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला. हे दाम्पत्य गेल्या 25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करत आहे. देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी हे काळे दापत्य करत आहे. भाऊसाहेब काळे हे व्यवसायाने शेती करतात. काळे दाम्पत्य हे आठ तास दर्शन रांगेत उभे होते. आज आषाढी एकादशी आहे. यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातून वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरी वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या भक्तीत वारकरी तल्लीन झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरावर विठुनामाचा, ज्ञानोबा तुकोबांचा गजर सुरु आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न
|