बातम्या

खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता होणार गुन्हे दाखल

The owners of the companies linking the fertilizers will also be booked now


By nisha patil - 7/26/2023 5:55:30 PM
Share This News:



कृषिमंत्र्यांची घोषणामोठ्या आणि प्रसिद्ध असलेल्या कंपन्या जास्त मागणी असलेल्या खताच्या सोबत आपल्याकडे उत्पादित करण्यात आलेले परंतु विक्री होत नसलेली खते शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी डीलर आणि कृषी सेवा केंद्रांना सक्ती करायला लावतात. गरज नसताना पैसे खर्चून शेतकऱ्यांना ती खते विकत घ्यावी लागतात, यावर चाप बसवण्याच्या दृष्टीने आता थेट संबंधित कंपनीच्या मालकावरच गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान अस्तित्वात आणले जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत बोलताना दिली आहे. कोणत्याही कंपनीचे खत बाजारात आणण्यापूर्वी त्या खतांची चाचणी  करून त्याचे प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. अप्रमाणित खते कोणत्याही परिस्थितीत बाजारात येणार नाहीत, याचीही काळजी कृषी विभाग घेत असून यापुढे अधिक गांभीर्याने ती काळजी घेतली जाईल, असेही यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. 

खतांबरोबरच  कीटकनाशके बियाणे यांच्या उत्पादन आणि विक्रीमध्ये बऱ्याच प्रमाणात बोगसगिरी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते. यावर आळा बसावा यासाठी राज्य शासन नव्याने अधिक कडक कायदा आणत असून त्या कायद्याची संरचना मंत्रिमंडळ उप समितीच्या माध्यमातून सुरू आहे. या कायद्याची निर्मिती करत असताना कृषी सेवा केंद्रांच्या संघटना, व्यापारी, डीलर्स यांच्या संघटना तसेच विविध तज्ञांचेही सल्ले घेतले जात आहेत. या सर्वांना विचारात घेऊनच कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही, तसेच कायद्यात कोणतेही त्रुटी राहणार नाही अशा पद्धतीने या कायद्याची संरचना करण्यात येत असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.


खतांचे लिंकिंग करणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवरही आता होणार गुन्हे दाखल