बातम्या

अहंकारी पालकमंत्र्यांचा सत्तेचा माज जनता उतरविणार : डॉ.प्रकाश शहापूरकर

The people will bring down the power of the arrogant guardian minister


By nisha patil - 4/11/2024 10:08:27 PM
Share This News:



अहंकारी पालकमंत्र्यांचा सत्तेचा माज जनता उतरविणार : डॉ.प्रकाश शहापूरकर 

  कौलगे येथील मेळाव्यात डॉ. शहापूरकर गटाचा महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांना पाठिंबा.....
 
  गडहिंग्लज / प्रतिनिधी 
निवडणुका आल्या की पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना माणसं विकत घ्यायची सवय झालेली आहे. त्यांच्या पैशाला माझ्यासह  एकही माझा कार्यकर्ता कधीही बळी पडलेला नाही किंबहुना त्यांचा एक कप चहा पिऊन देखील माझा कार्यकर्ता मिंधा नाही. जिल्ह्यातील प्रत्येक कामात ते स्वतः च्या सोयीने काम करत आहेत.दिवसेंदिवस त्यांच्या तोंडून येणारी बेताल वक्तव्ये ही अशोभनीय असून त्यांना पराकोटीचा सत्तेचा माज आलेला आहे.त्यांना आलेला हा सत्तेचा माज येत्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता नक्की उतरविणार असा विश्वास  गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश शहापूरकर यांनी व्यक्त केला.

   कौलगे (ता.गडहिंग्लज) येथील भावेश्वरी संकुलमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांना 
डॉ.शहापूरकर गटाचा पाठिंबा देण्यात आला. त्याप्रसंगी आयोजित केलेल्या डॉ.शहापूर गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

डॉ.शहापुरकर पुढे म्हणाले,सात हजार कोटींच्या विकासकामांचे ढोल पालकमंत्री मुश्रीफ बडवत आहेत. त्यांची ही विकासकामे म्हणजे जनतेच्या डोळ्यांमध्ये निव्वळ धुळफेक  असून आरोग्याच्या बाबतीत तर त्यांची एजंटगिरी मोठ्या प्रमाणात फोफावलेली आहे. गोड साखर कारखान्यातील मुश्रीफांच्या हस्तक्षेपा बद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांना पळता भुई देखील थोडी होईल इतके पुरावे आमच्याकडे आहेत. योग्य वेळी ते आम्ही जनतेसमोर मांडू . त्यांच्या  भ्रष्ट कारभाराला जनता आता कंटाळली असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना जनता धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असे सांगितले...

 महाविकास आघाडीचे उमेदवार राजे समरजिसिंह घाटगे म्हणाले, गडहिंग्लजसह  परिसरातील सामान्य जनतेने ज्यांना पंधरा वर्षे सत्ता दिली त्यांनी येथील घराघरांमध्ये केवळ भांडणे लावूनच सत्ता भोगली.या परिसरात आरोग्य,शिक्षणाची मोठ्या प्रमाणात वाताहात झाली असून आम्ही मंजूर करून आणलेले कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र रद्द करण्याचे पाप  पालकमंत्र्यांनी केले. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पालकमंत्र्यांना याचा जाब विचारण्याची वेळ आली असून या परिसरात मूलभूत सुख-सुविधा आणण्यासाठी आम्हाला साथ द्या असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी शिवानंद माळी, ॲड,दिग्विजय कुराडे,सुरेशराव कुराडे,शिवाजीराव खोत,पवन इंचनाळकर यांनी मनोगत व्यक्त केले..यावेळी गोड साखरच्या संचालिका कविता पाटील,प्रकाश पाटील,आनंद कुलकर्णी, बचाराम मोहिते, डॉ.अनिल कुराडे  यांच्यासह कौलगे परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी,महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..
   स्वागत प्रास्ताविक धोंडीबा पवार यांनी केले. गणपतराव डोंगरे यांनी आभार मानले..

 पालकमंत्र्यांनी सामान्यांच्या घरादारांवर
       नांगर फिरवला....

मनोगत व्यक्त करताना शिवाजीराव खोत म्हणाले, युवकांना दारू,मटण देऊन ढाबा संस्कृती उदयास आणणारे पालकमंत्री मुश्रीफ यांचे नाव न घेता एक उप्प्या (माकड) जिल्ह्यात एकहाती राज्य करत असल्याचे सांगितले . स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी येथील जनतेचा हात पालकमंत्री मुश्रीफांच्या हातात देऊन येथील जनतेचा सांभाळ करण्याचा शब्द घेतला होता.मात्र त्यांनी येथील जनतेचा सर्वच पातळ्यांवर विश्वासघात केला. विकासाच्या नावाखाली येथील जनतेच्या घरादारांवर अक्षरशः पालकमंत्र्यांनी नांगर फिरवला. याचा वचपा जनता मतदानाच्या माध्यमातून नक्की त्यांना धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही असे सांगतात उपस्थित सर्वांनीच टाळ्या-शिट्ट्या वाजवून त्यांच्या वक्तव्याला दाद दिली....


अहंकारी पालकमंत्र्यांचा सत्तेचा माज जनता उतरविणार : डॉ.प्रकाश शहापूरकर