बातम्या
वर्दीतील कर्मचाऱ्यानेच केली धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट
By nisha patil - 9/2/2024 4:58:53 PM
Share This News:
चक्क एका वर्दीतील पोलिसानेच सोशल मिडियावर सामाजिक भावना दुखावणारी पोस्ट व्हायरल केली आहे. त्यानंतर ही बाब लक्षात येताच या पोलीस कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ही खळबळजनक घटना बुलढाणा जिल्हा पोलीस दलात घडली असून गजानन खेर्डे असे या पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. ते खामगाव येथील पोलीस नियंत्रण कक्षात सहायक फौजदार या पदावर कार्यरत असताना त्यांचावर ही कारवाई करण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडियाचे जाळे जगभर विस्तारले असून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हे एक मोठे व्यासपीठ मानले जाते. मात्र या व्यक्तीस्वातंत्र्याला देखील समाजात काही मर्यादा आहेत. कुणाच्या धार्मिक, सामाजिक अथवा व्यक्तिगत भावनांना ठेच पोहोचेल, असा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करणे हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो. अनावधानाने तर कधी मुद्दाम एखादी वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणे हे कायद्याच्या अनुषंगाने फार महागात पडू शकतं. असाच एक धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्हा पोलीस दलात घडला आहे. समाज माध्यमावर कार्यकर्ते किंवा नागरिकांनी आक्षेपार्ह मजकूर टाकण्याच्या घटना आपण वाचतो. मात्र, एका पोलीस कर्मचाऱ्याने असा मजकूर टाकल्याचे निदर्शनास आले असून त्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे बुलढाणा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
गजानन खेर्डे यांनी दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल असा मजकूर व्हॉट्सअप ग्रुपवर टाकला. त्यानंतर ही पोस्ट वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरली. अनेकांनी याबाबत आक्षेप घेत त्यावर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली. मात्र, त्यानंतर देखील ही पोस्ट वायरल होत राहिली. परिणामी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी याची गंभीर दखल घेत खामगाव नियंत्रण कक्षाकडून अहवाल मागविला. पडताळणीनंतर खेर्डे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तसेच, बुलढाणा शहर ठाणेदारांना याची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान पोलीस मुख्यालयात पार पडलेल्या नियमित गुन्हे आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना दक्ष राहण्याचे निर्देश देखील जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिले.
वर्दीतील कर्मचाऱ्यानेच केली धार्मिक तेढ निर्माण करणारी पोस्ट
|