राजकीय
कदमवाडी, रुईकर कॉलनी परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार – राजेश लाटकर
By nisha patil - 11/18/2024 11:07:13 AM
Share This News:
कदमवाडी, रुईकर कॉलनी परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार – राजेश लाटकर
भीमनगर, कपूर वसाहतीत प्रचार सभेत आश्वासन
कोल्हापूर, – कदमवाडी ते रुईकर कॉलनी आणि परिसरातील ड्रेनेजचा प्रलंबित प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे काँग्रेस पुरस्कृत उमेदवार राजेश लाटकर यांनी दिले. भीमनगर, कपूर वसाहतीत झालेल्या सभेत ते बोलत होते. लाटकर पुढे म्हणाले, कदमवाडी, रुईकर कॉलनीसह आसपासच्या परिसरामध्ये ड्रेनेजची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. परिणामी प्रत्येक घरामध्ये सेप्टिक टँक आहेत. मात्र यामुळे आरोग्याची समस्या उभी राहते. निवडून आल्यानंतर पहिल्याच महिन्यात ड्रेनेजचा हा प्रश्न प्राधान्याने हाती घेऊन सोडविणार, त्याचबरोबर सांडपाण्याची निर्गत करण्यासाठी नियोजन करावे लागेल. थोडा जरी पाऊस झाला तरी मोठ्या प्रमाणात पाणी साचते, त्यासाठी योग्य आकाराच्या गटारी, नदीच्या पाण्यामुळे नुकसान होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे असे लाटकर म्हणाले. महापालिकेच्या माध्यमातून केलेल्या कामाचा मोठा उपयोग या ठिकाणी होईल. नगरसेवक, गटनेता ते स्थायी समिती सभापदी अशा पदांवर काम केल्याने कोणते काम कोणत्या विभागाकडे आहे, त्यासाठी कोणत्या विभागाकडे पाठपुरावा केला पाहिजे, याची जाण आहे त्या जोरावरच या प्रश्नाची सोडवणूक करणार आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज या पायाभूत सुविधा सोडविण्याची माझी जबाबदारी असेलच शिवाय येथील परिसराला प्रामुख्याने भेडसावणार प्रश्न आहे तो म्हणजे बी टेन्युअरचा. त्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी येथे येऊन या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे माझे प्रयत्न असतील.जनतेने प्रेशर कुकर चिन्हा पढील बटन दाबून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे लाटकर म्हणाले. ते म्हणाले, संविधानाने आपल्याला मत देण्याचा अधिकार दिला आहे.
तो तुम्हालाही एक मत देण्याचा अधिकार आहे तसाच अडाणी-अंबानींनाही अधिकार आहे. आपले मत विचारपूर्वक द्या. ज्याप्रमाणे मी आमदार झाल्यास त्याची विशेष अशी नोंद लिहिली जाईल त्याप्रमाणे मी कोणाच्या मतावर उमेदवार झालो, त्याचीही नोंद घेतली जाईल. बंदूकीची एक गोळी जे काम करते त्याप्रमाणे मतदानाची जादू आहे. यासाठी आपले निर्णायक मत येत्या २० तारखेला माझ्या प्रेशर कुकर या चिन्हाला देऊन तुमचा मुलगा, भाऊ, दादा या नात्याने मला विधानसभेत पाठवा. यावेळी उपस्थित डॉ. अनिल माने म्हणाले, जातीयवादी विचारांच्या सत्तेला आपणाला हटवायचे आहे. आम्ही आपल्याकडे बुद्ध विहारची मागणी करीत आहोत. २०१९ मध्ये ज्याप्रमाणे २०१९ मध्ये करेक्ट कार्यक्रम केला, त्याच पोस्टर बॉयचा यावेळीही करेक्ट कार्यक्रम करून त्यांना कायमचे घरी बसवायचे आहे. त्यासाठी मी येथील जनतेच्या वतीने ग्वाही देतो की आपणाला १०० टक्के मतदान येथील जनता देईल. महाराष्ट्राचे लक्ष असलेल्या कोल्हापूर उत्तरचा निकाल वीस तारखेला प्रेशर कुकरच्या बाजूनेच लागेल आणि आपला राजू विधानसभेत आमदार म्हणून भागाचे नेतृत्व करेल. यावेळी महेश जाधव, महावीर लाटकर, प्रकाश हुलेस्वार, सुरेश जत्राटकर व उदय फाळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कपूर वसाहतीत आपचे शहर अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, निवडणुकी आधीच आपणाला येथील कार्यकर्त्यांनी लावलेला गुलाल सार्थक ठरणार आहे.
स्वाभिमानी मतदार बंधू-भगिनीनो हीचा वेळ आहे आपल्या बहुमोल अशा मताचे मोल जाणण्याचा. त्यासाठी कितीही आमिषे आली तरी प्रामाणिक कार्यकर्त्याला निवडून देऊया. आजपर्यंत कधीही या भागात न आलेल्या विरोधी उमेदवारापेक्षा दररोज आपल्याशी संपर्क ठेवणारा राजेश लाटकर चांगला उमेदवार आहे. १५ वर्षे पद भोगलेल्या विरोधकांनी त्यांना मिळालेल्या एखाद्या कामातील टक्केवारी घेतली नसती तर शहरातील कित्येक अशी कामे उत्कृष्ट झाली असती आणि त्यांनी प्रचाराची वेळही आली नसती. जनतेने आपणहून त्यांना पुन्हा शहराचे नेतृत्व करण्याची संधी दिली असती. पण तुम्ही एक घटक सोडला नाही की ज्यामध्ये तुमचा व परिवाराचा विकासच तुम्हाला दिसतो आहे.
कदमवाडी, रुईकर कॉलनी परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न पहिल्याच महिन्यात मार्गी लावणार – राजेश लाटकर
|