बातम्या

निम्न पैनगंगा प्रकल्प परिसरातील गावकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात

The problems of the villagers in the Lower Panganga project area should be resolved


By nisha patil - 10/7/2024 12:55:52 PM
Share This News:



निम्न पैनगंगा प्रकल्प परिसरातील गावकऱ्यांना कोणत्याही समस्या येणार नाहीत याची दक्षता घ्यावी. प्रकल्प उभारताना गावे बाधित न करता पाणी साठवणीच्या विविध उपाययोजना सुचवाव्यात. तसेच त्यासंदर्भात अहवाल सादर करावा. अंतिम निर्णय होईपर्यंत प्रकल्प कामाची कार्यवाही करू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

आज विधान भवन येथे यवतमाळ जिल्ह्यातील निम्न पैनगंगा प्रकल्पासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. संदीप धुर्वे, नामदेव ससाणे, भीमराव केराम, विभागाचे अधिकारी, पैनगंगा प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले की, पैनगंगा प्रकल्प उभारणे आणि उपसा सिंचनाने होणारे फायदे यासाठी पर्यायी मार्गाबाबत सकारात्मक विचार करावा. गावांना बाधित न करता कोणत्या पद्धतीने पाणी अडवता येईल यासाठी सर्वोतोपरी विचार करून अहवाल सादर करावा.   विविध उपाययोजनांचा अभ्यास करून अंतिम निर्णय होईपर्यंत तसेच जनतेला कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागू नये यासाठी प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही न करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

भविष्यात उद्भवणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा विचार करून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सकारात्मक निर्णय करावा, अशी सूचनाही उपमुख्यमंत्री  फडणवीस यांनी केली.यावेळी संघर्ष समितीच्या प्रतिनिधींनी त्यांचे म्हणणे मांडले.


निम्न पैनगंगा प्रकल्प परिसरातील गावकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात