बातम्या

मोल नात्यांचे कथासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन संपन्न

The publication of the collection of stories of value relationships has been completed


By nisha patil - 2/9/2024 7:35:47 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील सुप्रसिद्ध साहित्यिका सौ. मेघा धनपाल उळागड्डे यांच्या "मोल नात्यांचे" या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच संपन्न झाले. पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे आयोजन पंढरपूर येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तसेच "मोल नात्यांचे" या कथासंग्रहाचे प्रकाशनही करण्यात आले.

प्रकाशन सोहळ्याला खासदार प्रणिती शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके, डॉ. बी.पी. रोंगे, दिलीप धोञे, नागेश फाटे यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात सौ. मेघा उळागड्डे यांना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल आंतरराष्ट्रीय साहित्यिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच विविध क्षेत्रातील मान्यवरांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या सोहळ्यात राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, साहित्य, उद्योग-व्यवसाय, कला-सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितीन बागल, सचिव रामदास सौदागर व इतर पदाधिकारी, सदस्य आणि नागरिकांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली.

सौ. मेघा उळागड्डे यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


मोल नात्यांचे कथासंग्रह पुस्तकाचे प्रकाशन संपन्न