बातम्या

माध्यम प्रतिनिधींनी कालमर्यादेत केलेले वार्तांकन कौतुकास्पद- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

The reporting done by the media representatives within the time limit is commendable


By nisha patil - 4/6/2024 12:02:09 PM
Share This News:



प्रसार माध्यमांची भूमिका सदोदीत आहे. लोकशाहीमध्ये ही भूमिका जबाबदार आणि प्रभावी बनत आहे. विधिमंडळाचे कामकाज सभागृहात सुरू असते, या कामकाजाविषयी मत, विचार जनता बनवित असते. हे सर्व माध्यम प्रतिनिधींनी केलेल्या वार्तांकनातून होत असते. वेळेच्या मर्यादेत, अचूकतेने प्रसार माध्यमांची कालमर्यादा पाळून प्रतिनिधींनी केलेले वार्तांकन कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी काढले.

                माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयातील वार्ताहर कक्षात माध्यम साक्षरता अभियानांतर्गत ‘ओळख विधिमंडळ कामकाजाची’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात विधिमंडळ कामकाजात आमदारांची भूमिका, विधिमंडळ समिती कामकाज व दस्तऐवज या विषयावर उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह,  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे, कार्यवाह प्रवीण पुरो, संचालक (प्रशासन) हेमराज बागुल  उपस्थित होते.

 उपसभापती डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, अधिवेशन वार्तांकनामध्ये नवीन आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना, त्यांच्या चर्चेला प्रसिद्धी मिळाल्यास त्यांचा हुरूप वाढतो. अधिवेशन सुरू असताना अनेक ज्वलंत प्रश्न सभागृहात चर्चेला येत असतात. या विषयांचा माध्यमांकडून त्या त्या वेळी उहापोह होत असतो. मात्र अधिवेशन संपल्यानंतर सदरील विषय मागे पडतात. अशा विषयांना अधिवेशन नसलेल्या काळातही माध्यमांनी प्रकाश टाकला पाहिजे. लक्षवेधी सूचनेचे वार्तांकन करताना लक्षवेधी सुचना मांडणाऱ्या सदस्यांचे नाव असले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

 सध्या डिजीटल माध्यमे येत आहेत. या माध्यमांमधून बऱ्याचवेळा अधुरी माहिती गेलेली असते. त्यामुळे समाजावर विपरीत परिणाम होवू शकतो. त्यामुळे डिजीटल माध्यमांनी जबाबदारीने वार्तांकन केले पाहिजे. विधिमंडळ कामकाजाचे वार्तांकन करणाऱ्या नवीन माध्यम प्रतिनिधींसाठी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या समन्वयाने किमान 4 दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम ठरविण्यात यावा, असेही त्यांनी सांगितले. विधिमंडळाचे बरेचसे कामकाज ऑनलाईन करण्यात आले आहे. विधेयके, अहवाल संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपूर्ण दस्तऐवज डिजीटल करण्यात येत आहे. विधिमंडळाच्या  कार्यपद्धतीमध्ये सुधारणेला बराच वाव असल्याचेही डॉ. गोऱ्हे यावेळी म्हणाल्या.

 मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तरे घेण्यात आली. उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी उत्तरे दिली. कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमाला माध्यम प्रतिनिधी, महासंचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते.


माध्यम प्रतिनिधींनी कालमर्यादेत केलेले वार्तांकन कौतुकास्पद- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे