बातम्या

जिल्ह्याच्या विकासात उद्योजक व नवउद्योजकांची भूमिका महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

The role of entrepreneurs and new entrepreneurs in the development of the district is important Collector Rahul Rekhawar


By neeta - 1/31/2024 2:07:15 PM
Share This News:



 

कोल्हापूर, दि. 30 (जिमाका):  यशस्वी उद्योजक जिल्ह्याचा विकास जोमाने करु शकतात, म्हणूनच जिल्ह्याच्या विकासात उद्योजक व नवउद्योजकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

 

        केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांच्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापकपणे व्हावा, या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या संकल्पनेतून एक दिवसीय तालुकास्तरीय कर्जाची माहिती व मार्गदर्शन मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात संपन्न झाला.

 

जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, आपण उद्योजक बनण्याचे निश्चित केले आहे, यातच तुम्ही अर्धी लढाई जिंकली असून उर्वरित लढाईसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. आपल्या व्यवसायाशी निगडित असलेल्या शासन पुरस्कृत योजनांची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन नवउद्योजकांनी यशस्वी उद्योजक बनावे, असे त्यांनी सांगितले. त्रुटी दूर करुन उद्योगांना आणि उद्योजकांना या मेळाव्यातून चालना मिळत आहे. आतापर्यंत 10 तालुक्यांमध्ये मेळावे झाले असून प्रत्येक मेळाव्याचा 500 ते 600 लोकांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे म्हणाले, जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर जिल्ह्यातच हा नाविन्यपूर्ण उपक्रम प्रत्येक तालुक्यात मेळाव्यांच्या स्वरुपात राबविला जात आहे. करवीर तालुक्याच्या मेळाव्यात 2500 ते 3000 लोकांनी माहिती घेतली. मागील वर्षापासून सुरु असलेल्या मेळाव्यामुळे सर्व शासकीय विभाग, बँका व लोकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. या मेळाव्यामुळे विविध शासकीय योजनांची जनजागृती झाली असून सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचून याचा परिणाम चांगला दिसत आहे. अनेक योजनांमध्ये बँक व शासकीय विभागांच्या योग्य समन्वयातून कोल्हापूर जिल्हा अग्रेसर असल्याचे श्री. गोडसे यांनी यावेळी सांगितले.

 

यावेळी बँक ऑफ इंडियाचे उपविभागीय प्रबंधक विशाल सिंग, करवीरचे उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरुण भिंगरदिवे, तहसीलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी विजय यादव, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच उद्योजक व नवउद्योजक कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

कर्ज मेळाव्यास 21 विविध विभागांचे अधिकारी, तालुक्यांतील सर्व बँकांचे अधिकारी- कर्मचारी त्यांच्या योजनांचे माहिती पत्रक, कर्ज मागणी अर्ज व इतर आवश्यक माहितीसह उपस्थित होते.


जिल्ह्याच्या विकासात उद्योजक व नवउद्योजकांची भूमिका महत्वपूर्ण - जिल्हाधिकारी राहुल रेखावार