बातम्या
मराठा सर्वेक्षण' करणाऱ्या शिक्षकांच्या शाळा सकाळी भरणार
By nisha patil - 1/24/2024 7:48:02 PM
Share This News:
मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त शिक्षकांना शाळेच्या कामातून सूट द्यावी किंवा शाळा सकाळी सत्रात भरवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या शिष्टमंडळाने केली.त्याबाबतचे निवेदन आज माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना दिले. त्यावेळी ज्या शाळेतील शिक्षक मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्त असतील अशाच शाळा सकाळच्या सत्रात भरविण्यास परवानगी आहे. ज्या शाळातील शिक्षक सर्वेक्षणासाठी नियुक्त नाहीत अशा शाळांनी नियमित वेळेत शाळा भरवाव्यात, अशा सूचना आंबोकर यांनी केली.
राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकारी यांना मराठा सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील शाळेतील शिक्षकांना मराठा सर्वेक्षण करण्याबाबत आदेश दिले आहेत. सर्वेक्षण करण्यासाठी काही शाळातील सर्व शिक्षकांना आदेश प्राप्त झाले आहेत. काही ठिकाणी मुख्याध्यापकांनाही आदेश प्राप्त झाले आहेत. सर्वेक्षण करताना प्रत्येक शिक्षकाला १०० कुटुंबाचे सर्वेक्षण करायचे आहे. त्यामध्ये एका कुटुंबातील सर्वेक्षण करताना त्यांना १५० पेक्षाअधिक प्रश्न विचारायचे असल्याने अर्धा ते पाऊणतास वेळ लागणार आहे.त्यानुसार तशा नोंदी करायच्या आहेत. हे सर्व काम आठ दिवसांत पूर्ण करायचे आहे. या दरम्यान चाचणी व पूर्व परीक्षा होत आहेत. त्यामुळे ज्या शिक्षकांना सर्वेक्षण करण्यासाठी आदेश मिळालेले आहेत त्यांना शालेय कामात सूट द्यावी किंवा शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. या शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश संकपाळ, राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष व्ही. जी. पोवार, दादा लाड, मिलिंद पांगिरेकर, श्रीकांत पाटील, बबन इंदुलकर यांचा समावेश होता.
मराठा सर्वेक्षण' करणाऱ्या शिक्षकांच्या शाळा सकाळी भरणार
|