बातम्या

हातकणंगले विधानसभेची जागा शिवसेनेचीच राहील - जिल्हाप्रमुख संजय चौगुले

The seat of the Hatkanangale Legislative Assembly will remain with the Shiv Sena


By nisha patil - 10/10/2024 2:48:15 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी: विनोद शिंगे हातकणंगले विधानसभेची जागा शिवसेनेचीच असून ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडेच राहावी यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातील, असे आश्वासन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी दिले आहे. विधानसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिणचे येथे शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांसाठी संवाद मेळावा तसेच सोशल मीडिया वापराविषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार डॉ. सुजित मिणचेकर आणि जिल्हाप्रमुख संजय चौगुले प्रमुख उपस्थित होते.

संजय चौगुले यांनी आपल्या भाषणात हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील जागा शिवसेनेचीच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी शिवसैनिकांना अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आणि पक्षाच्या यशासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.

या संवाद मेळाव्यात जिल्हा परिषद सदस्य महेशभाऊ चव्हाण, सभापती प्रवीणजी यादव, उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. त्यांनी हातकणंगलेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ताब्यातच राहील, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य पिंटू मुरूमकर, युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्नील मगदूम, उपतालुकाप्रमुख बाबासाहेब शिंगे, विजय भोसले, संदीप दबडे, उदय शिंदे आणि इतर पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक तसेच अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


हातकणंगले विधानसभेची जागा शिवसेनेचीच राहील - जिल्हाप्रमुख संजय चौगुले