बातम्या
स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने
By nisha patil - 2/11/2024 11:35:42 PM
Share This News:
स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने
शिरोली जकात नाक्यावरील तपासणीत कारवाई
कोल्हापूर, दि. 02 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक्र क्र 1 कोल्हापूर- सांगली रस्ता (शिरोली जकात नाका) येथील तपासणी नाक्यावर पथक प्रमुखांमार्फत एकूण 907 वाहने तपासण्यात आली. सायंकाळी 6 च्या दरम्यान मे. रेडिअंट व्हॅल्युएबल लॉजिस्टीक लिमिटेड या कंपनीचे पिकअप एमएच 46 सीएल 1534 या वाहनाची तपासणी केली असता या वाहनात 4 कोटी 3 लाख 3 हजार 71 रुपये इतक्या किंमतीचे 4949.21 ग्रॅम सोने, 11 लाख 51 हजार 861 रुपये किमतीची 6722.57 ग्रॅम चांदी, तर 1 कोटी 44 लाख 17 हजार 151 रुपये किमतीचे 884.71 ग्रॅम डायमंड असे एकूण 5 कोटी 58 लाख 72 हजार 85 रुपये किंमतीचे दागिने आढळून आले. याबाबत वाहनातील कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता हे दागिने चंदुकाका सराफ ॲण्ड सन्स लिमिटेड यांचे असल्याचे सांगितले.
या दागिन्याबाबत त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची (Receipts) पडताळणी आयकर विभाग व वस्तु व सेवा कर विभागामार्फत सुरु आहे. पडताळणी अंती संबंधित विभागामार्फत पुढील योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (महसूल) डॉ. संपत खिलारी यांनी कळविले आहे.
पथक क्र. 1 कोल्हापूर-सांगली रस्ता (शिरोली जकात नाका), पथक क्र. 2 शिये-बावडा रस्ता, छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना कमानी समोर व पथक क्र. 3 कोल्हापूर- रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी पुल येथे कार्यरत आहे. यामध्ये दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी तीनही तपासणी नाक्यावर 2 हजार 72 वाहनांची तपासणी केली असता हे दागिने आढळून आले असून या दागिन्यांची पडताळणी होईपर्यत या वाहनातील मौल्यवान धातू (दागिने) हे आयकर विभाग तथा वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिकारी यांच्या समक्ष सिलबंद करुन जिल्हा कोषागार कार्यालय कोल्हापूर येथे जमा करण्यात आले आहेत.
सद्यस्थितीत वाहनामधील कागदपत्रांची तपासणी वस्तु व सेवा कर विभागाच्या उपआयुक्त दिपाली शेलार यांच्यामार्फत सुरु असून यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे, असे 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार सैपन नदाफ यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले वाहनात 5 कोटी 58 लाखांचे मौल्यवान दागिने
|