बातम्या

युवकाने एका गुंठ्यात तब्बल ३ टनापेक्षा अधिक मिळवले उत्पादन

The youth obtained more than 3 tons of produce in one bunch


By neeta - 12/28/2023 2:27:16 PM
Share This News:



 

पन्हाळा :  पन्हाळा येथील वाघवे गावातील युवा शेतकरी उदय पाटील यांनी एका गुंठ्याला तब्बल ३ टनापेक्षा अधिक असे १८ गुंठ्यात तब्बल ५७ टन ८६०३२ ऊसाचे उच्चांकी उत्पादन घेवून आजच्या युवकांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.दरम्यान  भुईमूग ,मिरची ,मेथी या आंतरपिकांचे सव्वा लाख रुपये ही त्यांनी मिळवले असून ५० हजार रुपये खर्च वगळता सुमारे अडीच लाख रुपये १८ गुंठ्यात उदय पाटलांना निव्वळ नफा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी ऊसाचे उत्पादन मिळाल्याने दत्त दालमिया कारखान्याचे युनिट हेड श्री रंगाप्रसाद, शेती अधिकारी संग्राम पाटील ,साॅलीडरीडॅड संस्थेच्या अधिकाऱ्यांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघवेतील ऊसशेतीला भेट देवून उदय पाटील यांचे  अभिनंदन केलयं.

पन्हाळ गडाच्या पायथ्याशी वसलेल्या वाघवे गावातील उदय पाटील हे युवा शेतकरी खाजगी नोकरी करत नेहमी आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करत असतात. गेल्या काही वर्षापूर्वी त्यांनी पाॅलीहाऊस शेती केली होती. याचाच अनुभव लक्षात घेऊन त्यांनी ऊसशेतीमध्ये ही नवनवीन प्रयोग करुन एका गुंठ्याला ३ टनापेक्षा अधिक विक्रमी ऊसाचे उत्पादन घेतले आहे. उदय पाटील यांनी सुरवातीला १८ गुंठ्यात १० टाॅल्या शेणखत घालून उभीआडवी नांगरट केली. तसेच दक्षिण उत्तर अशी चार फूटाची सरी सोडली. त्यानंतर ३० आॅगस्ट २०२२ रोजी ८६०३२ या जातीच्या ऊसाची दीडफूटावरती एकडोळा पध्दतीने लागवड केली. त्यामध्ये त्यांनी आंतरपिक म्हणून भुईमूग आणि मिरची चीही लागवड केली. तसेच ठिबक सिंचनद्वारे पाणीपुरवठा करत भरणीपर्यत नॅनोटेक हायटेक ,बायोजेम याच्या दोन महिने आळवण्या केल्या. त्यानंतर बाळभरणी करून मेथी चे ही पिक घेतले. त्यानंतर एफको, महाधन,जयकिसान ,युरीया यासह वेगवेगळ्या खतांसह औषधांचा वापर करून पावरटेलरने अंतिम भरणी केली.आणि उसाची उंची सहाफूटाहून अधिक होईपर्यंत महिन्यातूंन दोन तीन टाॅनिकच्या फवारण्या केल्या.तसेच १५ महिन्यात ऊसशेतामध्ये तणनाशकाचा वापर न करता वारंवार पावरटेलरने नांगरट करून भांगलण केली. त्यामुळे जोमाने ऊसाची वाढ होवून १८ गुंठ्यात ३० फूट लांब आणि ४५ ते ५० पेऱ्यांचा ऊसाचा डोंगर उभा राहिला.अखेर गेल्या काही दिवसांपूर्वीच या १८ गुंठ्यातील ऊसतोड करण्यात आली असून त्यांना तब्बल ५७ टन ऊसाचे भरघोस उत्पादन मिळाले.

   आंतरपीकांचे सव्वा लाख रुपये आणि ऊसाचे अडीच लाख रुपये असे १८ गुंठ्यात तीन लाखाचे उत्पादन उदय पाटील यांनी मिळवले असून जवळपास ५० हजार रुपये खर्च वगळता त्यांना अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. तसेच इतर क्षेत्रामध्ये ही त्यांचे असेच उत्पादन असून उदय पाटलांना एकरी सुमारे १२० टनापेक्षा अधिक ऊसाचे उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे याची दाखल घेवून दत्त दालमिया साखर कारखान्याचे युनिट हेड रंगाप्रसाद, शेती अधिकारी संग्राम पाटील सॉलीडरीडँड संस्था यांच्या सह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऊसक्षेत्राला भेट देवून उदय पाटील यांचे अभिनंदन केले आहे. त्यामुळे उदय पाटील यांनी शेतीमध्ये कष्ट करून योग्य नियोजनाद्वारे शेती केल्यास चांगला फायदा मिळतो हे दाखवून युवकांसमोर आदर्श घालून दिला आहे.


युवकाने एका गुंठ्यात तब्बल ३ टनापेक्षा अधिक मिळवले उत्पादन