बातम्या
'या' आठ गावांचा समावेश करून कोल्हापूर हद्दवाढीची कोंडी फुटण्याची शक्यता
By nisha patil - 9/14/2023 5:52:24 PM
Share This News:
गेल्या पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीची कोंडी प्रशासकीय पातळीवर फुटण्याची चिन्हे आहेत. नुकत्याच झालेल्या कोल्हापूर दौऱ्यात उपमुख्यमंत्री कोल्हापूरच्या विकासावर भाष्य करताना हद्दवाढ किती अत्यावश्यक असल्याचे सांगत हात जोडले होते. तसेच पुण्यातील आजवर कितीवेळा हद्दवाढ करण्यात आली आणि धनकवडी घेण्यास उशीर झाल्याने त्याचे कसे परिणाम झाले हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर मंत्रालयातही प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या असून कोल्हापूर मनपाकडून दिलेल्या प्रस्तावापेक्षा शहराच्या हद्दीला लागून असलेल्या आठ गावांचा समावेश करून कोंडी फुटण्याची दाट चिन्हे आहेत.
प्रलंबित असलेल्या कोल्हापूरची हद्दवाढ करण्यासाठी चार दिवसांपूर्वीच बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीसाठी नगररचना विभागाचे सहायक संचालक विनय झगडे उपस्थित होते. यावेळी दिलेल्या प्रस्तावावर हद्दवाढीपेक्षा शहराला लागून असलेल्या गावांना घेऊन मार्ग काढण्यावर एकमत झाल्याचे समजते. कोणताही वादाला तोंड न फोडता तातडीने निर्णय कसा घेता येईल, यासाठी खल करण्यात आल्याची माहिती आहे. मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिगे, पीरवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, शिरोली, उंचगाव, शिंगणापूर, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी या 18 गावांसह गोकुळ शिरगाव व शिरोली या दोन एमआयडीसींचा समावेश आहे. मात्र, 18 गावे आणि एमआयडीसी घेऊन हद्दवाढ करताना येणाऱ्या आव्हानांचा विचार करता शहराला लागून असलेल्या आणि शहरीकरण झालेली कळंबा, पाचगांव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, वळीवडे-गांधीनगर, शिंगणापूर, नागदेववाडी, बालिंगा, मोरेवाडी, उचगांव या 8 गावांचा हद्दवाढीत समावेश होण्याची आहे. त्यामुळे हद्दवाढीला चालना मिळू शकते
'या' आठ गावांचा समावेश करून कोल्हापूर हद्दवाढीची कोंडी फुटण्याची शक्यता
|