बातम्या

सुळकूडचे पाणी मिळणारच असल्याने आंदोलनाची गरज नाही : आमदार प्रकाश आवाडे

There is no need to protest as Sulkood water will be available


By nisha patil - 9/13/2023 12:05:27 AM
Share This News:



इचलकरंजी/प्रतिनिधी -राज्य शासनाने सुळकूड उद्भव दुधगंगा योजना मंजूर केली आहे. त्यामुळे सुळकूडचे पाणी मिळणारच असल्याने त्यासाठी आपल्याला आंदोलन करण्याची काहीच गरज नाही. मात्र दुधगंगा योजना पूर्ण होण्यास कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत शहराला दररोज पाणी मिळण्यासाठी कृष्णा आणि पंचगंगा योजना बळकट करुन शहराला दररोज पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. दरम्यान, पुढील आठवड्यात इचलकरंजीचा पाणीप्रश्‍न आणि माझी भूमिका या विषयावर आपण जाहीर सभा घेऊन जनतसमोर आपले मत मांडणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणार्‍या कृष्णा योजनेची 5.2 किलोमीटरची मुख्य जलवाहिनी बदलण्यात येणार आहे. त्या कामासंदर्भात मंगळवारी आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी ते मजरेवाडीपर्यंत होणार्‍या कामाची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी महापालिकेचे जलअभियंता सुभाष देशपांडे, शाखा अभियंता बाजी कांबळे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर आणि मक्तेदार मौला बागवान हेही उपस्थित होते.
 

यावेळी आमदार आवाडे यांनी सातत्याने गळती लागणार्‍या ठिकाणाची पाहणी करत त्याठिकाणी केल्या जाणार्‍या क्रॉस पाइपचे काम तातडीने हाती घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर मजरेवाडी येथील कामाची पाहणी करुन माहिती जाणून घेतली. यानंतर माहिती देताना ते म्हणाले, इचलकरंजी शहरासाठी पाण्याची गरज ओळखून ज्यावेळी कृष्णा योजना मंजूर करुन आणली. त्यावेळी अनेक मंडळींनी या योजनेला विरोध दर्शविला होता. उलटी गंगा आणण्याचा प्रयत्न अशी खिल्ली उडविली होती. आता त्याच मंडळींना सुळकूड योजनेचा पुळका आला आहे. शासनाने सुळकूड योजना मंजूर केली असून  ज्यांचा त्याला विरोध आहे त्यांनी हा विरोध कशासाठी याचे ते शासनाला पटवून सांगावे. ही योजना पूर्ण होईपर्यंत शहराला पाणी मिळण्यासाठी कृष्णा आणि पंचगंगा या योजनांचे बळकटीकरण करणे गरजेचे आहे आणि आपण त्यासाठी प्रयत्नशील आहोत. कृष्णा योजनेची क्षमता 45 एमएलडीची असली तरी विविध ठिकाणच्या गळती आणि विविध कारणांनी प्रत्यक्षात शहराला 35 ते 37 एमएलडी पाणी मिळते. तर पंचगंगा योजनेतून सध्या 15 ते 18 एमएलडी पाणी मिळते. इचलकरंजी शहराला प्रत्यक्षात 60 ते 70 एमएलडी पाण्याची गरज आहे. तर शहरात 54 एमएलडी क्षमतेचे दोन फिल्टर प्लँट तयार आहेत. तर कृष्णा योजनेची 5.2 किमी अंतराची जलवाहिनी बदलण्याच्या कामाचे टेंडर निघाले असून लवकरच काम सुरु होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न संपुष्टात येईल. त्याचबरोबर मजरेवाडी येथे 540 अश्‍वशक्तीचे दोन सबमर्सिबल पंप बसविण्यात येणार असून त्यामुळे पावसाळ्यातही पाणी उपसा करण्यात अडचणी येणार नाहीत. तर पंचगंगा योजनेच्या ठिकाणी पंप बदलल्याने दोन्ही ठिकाणाहून जवळपास 80 एमएलडी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी या दोन्ही योजना बळकट करुया. कृष्णा योजनेला विरोध करणारे आता सुळकूडचा प्रश्‍न आण्णाच सोडविणार हे समजल्याने आमच्या बरोबर राहण्याचा प्रयत्न करत आहेत. सुळकूडसाठी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्याची गरज नाही. केवळ राजकारणासाठी राजकारण करणारी मंडळी एका बाजूला आली आहेत. एका योजनेला विरोध करुन दुसर्‍या योजनेसाठी पळापळ करत आहेत. प्रत्यक्षात इचलकरंजीला सुळकूडचे पाणी मिळणारच असून तोपर्यंत कृष्णा-पंचगंगा योजना बळकट करुन शहराला दररोज पाणी देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
 

इचलकरंजीचा पाणीप्रश्‍न आणि माझी भूमिका यावर मी जाहीर सभेत जनतेसमोर स्पष्ट मत मांडणार असून चूक की बरोबर हे जनताच ठरवेल, असेही ते म्हणाले. जॅकवेलच्या ठिकाणी शासन निर्देशानुसार प्राविण्यप्राप्त व्यक्तीची गरज असते. परंतु प्रत्यक्षात त्याठिकाणी कोणतेही काम न करता महापालिकेला लुटणार्‍या टोळीतील काही मंडळींनी तेथे आपली मक्तेदारी निर्माण करत शहरातील पाण्याचा खेळखंडोबा मांडला आहे. त्यांचाही समाचार आपण घेणार असून जनतेनेही नेमके या मागे कोणते गुपित दडले आहे ते तपासण्याची गरज असल्याचे आमदार आवाडे यांनी सांगितले.


सुळकूडचे पाणी मिळणारच असल्याने आंदोलनाची गरज नाही : आमदार प्रकाश आवाडे