ताज्या बातम्या

एफआरपी'बाबत शेतकऱ्यांचा विरोध नाही, पण शेट्टी वेठीस धरतात – शासनाची न्यायालयात भूमिका

There is no opposition from farmers regarding FRP


By nisha patil - 2/19/2025 12:55:26 PM
Share This News:



एफआरपी'बाबत शेतकऱ्यांचा विरोध नाही, पण शेट्टी वेठीस धरतात – शासनाची न्यायालयात भूमिका

मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी (Fair and Remunerative Price) देण्यास फारसा विरोध नाही. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि काही शेतकरी शासन निर्णयाला विरोध करत असल्याचा दावा महाभियोक्ता अॅड. विरेन सराफ यांनी केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी सांगितले की, "गेल्या तीन वर्षांत इतर कोणत्याही शेतकऱ्यांनी याला आक्षेप घेतलेला नाही. उलट शेट्टी हेच साखर कारखानदार आणि राज्य सरकारला वेठीस धरत आहेत."

राजू शेट्टींच्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी

एफआरपीचे तीन टप्पे करण्याच्या शासन निर्णयाविरोधात राजू शेट्टी यांनी याचिका दाखल केली आहे. त्यांच्या वतीने अॅड. योगेश पांडे यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद करत, "जर संख्येचा प्रश्न असेल, तर आम्ही हजारो शेतकऱ्यांना न्यायालयात हजर करू शकतो. न्यायालयाने परवानगी दिल्यास पुढच्या सुनावणीला हे शक्य होईल," असा आग्रह धरला. यावर न्यायालयात उद्या (गुरुवारी) पुढील सुनावणी होणार आहे.

एफआरपी थकबाकीवरून शेट्टींचा सरकारवर हल्लाबोल

राजू शेट्टी यांनी सरकारवर आणि साखर कारखानदारांवर जोरदार टीका करताना सांगितले, "सुधारित कायद्याचा आधार घेत चालू हंगामातील १० हजार कोटींची एफआरपी थकवण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या करातून उभ्या राहिलेल्या सरकारच्या तिजोरीतून पगार घेणारे महाभियोक्ता आणि शेतकऱ्यांच्या वर्गणीवर चालणारा राज्य साखर संघ यांनी शेतकऱ्यांची बाजू घ्यायला हवी होती. मात्र, हे दोघेही साखर कारखानदारांची बाजू घेत आहेत आणि शेतकऱ्यांना आर्थिक संकटात लोटत आहेत."

एफआरपीच्या मुद्द्यावरून न्यायालयात आणि शेतकरी संघटनांमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. आगामी सुनावणीत यावर काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


एफआरपी'बाबत शेतकऱ्यांचा विरोध नाही, पण शेट्टी वेठीस धरतात – शासनाची न्यायालयात भूमिका
Total Views: 63