बातम्या

राज्यातील दिव्यांगांचे होणार सर्वेक्षण

There will be a survey of disabled people in the state


By nisha patil - 1/6/2024 12:33:00 PM
Share This News:



राज्यातील दिव्यांगांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसल्याने दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात अडचणी येत आहेत.यामुळे दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने घेतला आहे. यामुळे राज्यात तब्बल तीस वर्षांनंतर दिव्यांगांचे सर्वेक्षण होणार आहे. दिव्यांगासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आहेत.

या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्यात घरोघरी जाऊन दिव्यांगांची माहिती घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील दिव्यांगांच्या सर्वेक्षणासाठी संबंधित जिल्हाधिकारी व महापालिका क्षेत्रात संबंधित आयुक्त नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. दिव्यांगांच्या सर्वेक्षणाच्या कामासाठी स्वयंसेवी संस्थेची निवड केली जाणार आहे. महापालिका क्षेत्रात आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समितीत सहायक आयुक्त किंवा जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सदस्य सचिव असून, आरोग्य उपायुक्त व महिला व बालविकास उपायुक्त या सदस्यांचा समावेश आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक यांच्यामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे.

सर्वेक्षणात एकसमानता राहण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला प्रश्नावली देण्यात येणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाच्या निर्णयात स्पष्ट केले आहे.


राज्यातील दिव्यांगांचे होणार सर्वेक्षण