बातम्या
योगाविषयी नेहमी ‘हे’ प्रश्न विचारले जातात, जाणून घ्या उत्तरे
By nisha patil - 3/22/2024 9:40:44 AM
Share This News:
योगा सुरू केल्यानंतर आहार कोणता आणि कधी घ्यावा ? योगा कधी करावा? योगा आणि आहाराचा काही संबंध आहे का? योगाचे काही दुष्परिणाम आहेत का? असे प्रश्न अनेकांना पडतात. परंतु, या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे शक्यतो मिळत नाहीत. योगसाधकांच्या मनातील याच नेहमीच्या प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
व्यायाम आणि योगात फरक काय ?
व्यायामात जलदगतीने हालचाली होतात. आसनात सावकाश हालचाल होते. व्यायामाने शारीरिक विकास होतो तर योगासनाने मानसिक, बौद्धिक व शारीरिक विकास होतो. व्यायामात स्नायू संवर्धन होते. पण ते ताठर बनतात, योगात स्नायू लवचिक होतात.
योगाचा दुष्परिणाम आहे का ?
योगाने काहीच दुष्परिणाम होत नाहीत. उलट एखाद्या अवयवासाठी योगा करीत असताना पूर्ण शरीराला फायदा होतो. योगामुळे नुकसान झाले, असे आजपर्यंत सिद्ध झाले नाही.
योगा करताना काय पथ्ये पाळावीत ?
व्यसने टाळावीत. चहा, कॉफी घेऊ नये. धूम्रपान, मद्यपान करू नये. तरच योगाचा फायदा होईल.
महिलांनी योगा कधी करावा ?
योगा बालक सोडून सर्वांनी करावा, असा प्रकार आहे. योगा करताना महिलांनी काही पथ्ये पाळावीत. विशेषत: महिलांनी मासिक पाळी व अपत्यप्राप्ती दरम्यान योगा करु नये.
आजारी माणसाने योगा करावा का ?
योगा कोणालाही करता येतो, काही रोग टाळण्यासाठी किंवा रोग बरा करण्यासाठी योगा केला जातो. दुर्धर आजार, मानसिक आजारात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आहार कोणता घ्यावा ?
योगा करताना पोट रिकामे असावे. कोणताही आहार घेतल्यावर तीन-साडेतीन तासानंतर योगा करावा. पाणी, पेय घेतल्यावर एक तासाने योगा करावा. योगा केल्यावर एक तासाच्या आत पेय आणि दोन तासांपर्यंत जेवण करणे अयोग्य आहे.
योगाभ्यास कुठे करावा ?
योगासाठी मोकळी, हवेशीर आणि स्वच्छ जागा असावी. प्रकाश मंद असावा. उष्ण प्रकाश नको. ओलसर भिंती आणि जमीन नको. शांतता असावी.
पोशाख कसा असावा ?
पोशाख सैल असावा. पुरुषांनी हाफपँट, बनियन, वापरावे. महिलांनी पंजाबी ड्रेस वापरावा. महिलांनी केस बांधून ठेवावेत. कापड किंवा चटई अंथरून बसावे.
वयाचे काही बंधन आहे का ?
योगाभ्यास हा वयाच्या १२ ते ८० वर्षे वयापर्यंत केला जाऊ शकतो. युवक, वृद्ध, व्याधीग्रस्त किंवा अशक्त व्यक्तीही योगा करू शकते.
योगाभ्यास केव्हा करावा ?
योगाची एक वेळ ठरवावी. तिचा कालावधी ठरवावा. रोज एकच कालाावधी असावा. शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी दररोज पाऊण तासाचा योगा आवश्यक असतो. योगा सहसा सकाळी करावा. ६ ते ७ ही वेळ योग्य आहे.
योगाविषयी नेहमी ‘हे’ प्रश्न विचारले जातात, जाणून घ्या उत्तरे
|