बातम्या

राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

This campaign should be successful by bringing tricolor to every house in the state


By nisha patil - 9/8/2024 2:08:22 PM
Share This News:



राज्यात ९ ते १५ ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा मोहिम राबविण्यात येत आहे. हा आपला राष्ट्रीय सण असून यात सर्वांना सहभागी करुन घ्यावे आणि प्रत्येक घरापर्यंत तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत घरोघरी तिरंगा अभियानाच्या तयारीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय. एस. चहल, विकास खारगे, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, जलसंपदा विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासह विविध विभागांचे सचिव आणि विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की घरोघरी तिरंगा हे अभियान राष्ट्रभक्ती चेतवणारे अभियान असून या काळात प्रत्येक दिवशी रॅलीसह, मॅरेथॉन, सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक अभिनव उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमुळे सगळीकडे देशभक्तीमय वातावरण तयार होणार आहे. या अभियानात व्यापक जनसहभाग वाढण्यासाठी समाजमाध्यमांसह विविध माध्यमातून जनजागृती करावी. सोबतच घरोघरी राष्ट्रध्वज उपलब्ध करुन द्यावा याकरिता जिल्हास्तरावर नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन द्यावा. राज्यातील प्रमुख धरणांसह मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, वरळी सी लिंक, गेटवे ऑफ इंडिया यासारख्या महत्वाच्या ठिकाणी तिरंग्याची रोषणाई करण्यात यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

            यावेळी मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव श्री.खारगे यांनी घरोघरी तिरंगा अभियानाबाबत सादरीकरण केले.


राज्यात घरोघरी तिरंगा पोहचवून हे अभियान यशस्वी करावे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे