बातम्या

यंदा सार्वजनिक दसरा शाही थाटात साजरा होणार सुरेशदादा पाटील यांची माहिती

This year the public Dussehra will be celebrated in royal grandeur   Information of Sureshdada Patil


By nisha patil - 10/21/2023 1:29:04 PM
Share This News:



यंदा सार्वजनिक दसरा शाही थाटात साजरा होणार   सुरेशदादा पाटील यांची माहिती 

इचलकरंजी /प्रतिनिधी- सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्यावतीने मागील २० वर्षापासून शहरात सुरु करण्यात आलेला शाही दसरा महोत्सव यंदा मोठ्या उत्साहात आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. शाही मिरवणूक, पुरस्कार वितरण, सिमोल्लंघन सोहळा आदी कार्यक्रम मंगळवार २४ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी श्रीमंत ना. बा. घोरपडे चौक (दसरा चौक) येथे होतील, अशी माहिती दसरा महोत्सव समितीचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी दिली. यावेळी इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव घोरपडे सरकार यांचे वारसदार यशवंतराव घोरपडे सरकार हे महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत तसेच श्रीमंत भवानीसिंह घोरपडे सरकार (सरसेनापती संताजी घोरपडे सरकार यांचे वंशज), यांच्या सह माजी खा. जयवंतराव आवळे, मा. आम. सुरेशराव हाळवणकर, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, डीवायएसपी समरसिंह साळवे, भगतराम छाबडा, शिवराज चुडमुंगे, धोंडीलाल शिरगावे,  रविंद्र जावळे, इंद्रजीत बोंद्रे, पुष्कर पाटील यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मागील दोन-तीन वर्षे कोरोना महामारीचे संकट आणि शासन निर्बंधांमुळे शाही दसरा महोत्सव साजरा करता आला नव्हता. परंतु यंदापासून पुनश्च दसरा महोत्सवाचा थाटात शुभारंभ केला जाणार आहे. प्रथेनुसार छत्रपती शाहू पुतळ्यापासून दुचाकी रॅली छत्रपती शिवाजी पुतळा मार्गे गांधी पुतळा ते गावभागातील अंबाबाई मंदिरा पर्यंत असेल व तसेच मंदिरापासून पासून शाही मिरवणूकीस प्रारंभ होईल. त्यामध्ये उंट, घोडे, भालदार, चोपदार, अष्टप्रधान मंडळ, गोंधळी, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, ढोल-ताशा व तुतारी वाद्यांचा गजर असा भव्य लवाजामा असेल. प्रथेप्रमाणे मिरवणूक झेंडा चौक, राजवाडा मार्गे, गांधीपुतळा येथे आल्यानंतर नवचंडीकेचे पूजन होऊन कोहळा फोडण्याचा विधी होईल. त्यानंतर मिरवणूक दसरा चौकात आल्यानंतर स्वागत समारंभ होईल. त्यानंतर सार्वजनिक दसऱ्याचे मानकरी सुरेशदादा पाटील यांच्या हस्ते सिमोल्लंघनाचा कार्यक्रम होईल. यावेळी माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यासह विविध संस्थांनचे सरकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.


यंदा सार्वजनिक दसरा शाही थाटात साजरा होणार सुरेशदादा पाटील यांची माहिती