बातम्या

सलग तीन दिवसांत तिघांचा पालघर मध्ये बुडून मृत्यू

Three people drowned in Palghar in three consecutive days


By nisha patil - 7/18/2023 7:09:01 PM
Share This News:



 पालघर जिल्ह्यात मागील पंधरवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे  चांगलेच प्रवाहित झाले आहेत. या धबधब्यांवर सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. मागील दोन दिवसांत पालघरमधील  विविध निसर्गरम्य ठिकाणांवर तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात असतानाही साहसी पर्यटक जीव धोक्यात घालवून धबधब्यांवर जात आहेत.पालघर जिल्ह्यातील धबधब्यांवर मनाई आदेश लावले असताना देखील काही अतिउत्साही पर्यटक थेट आपला जीव धोक्यात घालत आहेत. त्यामुळे आता अशा प्रवाहित झालेल्या धबधब्यांवर जीवरक्षकांची  नेमणूक करून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.
पर्यटन स्थळांवर विविध ठिकाणी सूचना फलक देखील लावलेले असतात, त्याच्याकडेही लक्ष न देता पर्यटक आपला जीव धोक्यात घालतात. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या सूचनांकडे लक्ष न देता काही जण मजा मारतात आणि आपला जीव धोक्यात घालतात, त्यामुळे  जास्त धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी न जाता लांबूनच या पर्यटनस्थळांचा आनंद लुटावा, असं आवाहन पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पर्यटकांना केलं आहे.
मुंबईलगत असलेल्या पालघरमधील जव्हार हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. या पर्यटनस्थळाला मिनी महाबळेश्वर  म्हणूनही संबोधलं जातं. जव्हारच्या आजूबाजूला दाभोसा, हिरडपाडा आणि काळ मांडवी हे पर्यटकांना आकर्षित करणारे मनमोहक धबधबे आहेत. अतिदुर्गम भागात असलेला दाभोस धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जव्हार तालुक्यापासून  20 किमी अंतरावर हा दाभोस धबधबा वसलेला आहे. या धबधब्याची उंची किमान 300 फूट आहे.

 पालघर जिल्ह्यासह मुंबई तसेच गुजरात , नाशिक , आणि सिल्वासा येथून मोठ्या प्रमाणावर पर्यटक या धबधब्याला भेट देतात. विशेष म्हणजे बाराही महिने हा धबधबा खळखळून वाहत असतो. त्यामुळे पावसाळा सुरु नसतानाही पर्यटकांना या स्थळाचा आनंद घेता येतो, पण पावसाळ्यात या धबधब्याचं सौंदर्य अधिक खुलतं.


सलग तीन दिवसांत तिघांचा पालघर मध्ये बुडून मृत्यू