बातम्या

जयसिंगराव तलावातून तीन हजार ट्राॕली गाळ उचलला

Three thousand trolleys of silt was lifted from Jaisingrao lake


By nisha patil - 6/16/2023 4:40:09 PM
Share This News:



कागल,प्रतिनिधी. शासनाच्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत  ऐतिहासिक जयसिंगराव तलावातील गाळ काढण्याचे काम आठ दिवसांपासून युद्ध पातळीवर सुरु आहे. आज अखेर तीन हजार  ट्रॉली गाळयुक्त माती  उचलण्यात आली आहे.  आणखी तीन हजार ट्राॕली माती  बाहेर काढण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या तलावात सव्वा कोटी लिटर पाणी जादा साठवणूक होण्यास मदत होईल. असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी केले.
 घाटगे  यांच्या पाठबळातून व संकल्पनेतून   राज्यात सर्वप्रथम या तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन या कामाची त्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
सद्या या ठिकाणी सात जेसीबी मशीन व ऐंशी ट्रॅक्टर-ट्राॕली गाळ उचलण्याचे काम अहोरात्र करीत आहेत. पावसाळ्यापुर्वी जास्तीत जास्त गाळ काढण्याच्या दृष्टीने त्यामध्ये वाढ करण्याच्या सूचना संबंधितांना श्री. घाटगे  यांनी दिल्या. त्यामुळे उद्यापासून या ठिकाणी बारा जेसीबी मशीन व सव्वाशे ट्रॅक्टर-ट्राॕली गाळ उपसण्याचे काम करणार आहेत. 
श्री.घाटगे पुढे म्हणाले, तलावातील गाळ काढण्याच्या या स्तुत्य उपक्रमास  शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे तलावातील पाणी साठवणूक क्षमता वाढनार असल्याने यापुढे कागलवासियांना पाणीटंचाई भासणार नाही. शिवाय शेतकऱ्यांना जमिनीत पसरण्यासाठी गाळ उपलब्ध झाल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढणार आहे. असा दुहेरी फायदा या उपक्रमामुळे होणार आहे. 
वास्तविक लोकप्रतिनिधीं म्हणून  कागलवासियांना पाणीटंचाई भासू  नये याची जबाबदारी आमदार मुश्रीफ साहेब यांची होती. परंतु कागलच्या नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही.त्यामुळे कागलवासियांसमोर पाणी टंचाईचे संकट आले आहे.मात्र ते अधिकार्‍यांवर बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहेत.कागलवासियांच्या जिव्हाळ्याच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाकडे आमदार हसन मुश्रीफ यांचे दुर्लक्ष का?असा सवालही त्यांनी केला.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत उर्फ बॉबी माने,युवराज पाटील, राजे बँकेचे उपाध्यक्ष नंदकुमार माळकर, संचालक राजेंद्र जाधव, आप्पासो भोसले, उमेश सावंत, पप्पू कुंभार,पांडुरंग जाधव जल अभियंता विजय पाटील आदी उपस्थित होते.


जयसिंगराव तलावातून तीन हजार ट्राॕली गाळ उचलला