बातम्या
आषाढी एकदशीनिमित्त बा पांडुरंगाला, वारकरी माऊलींना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून वंदन
By nisha patil - 6/28/2023 10:44:42 PM
Share This News:
तारा न्युज वेब टीम : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूरच्या बा पांडुरंगाला आणि पांडुरंगभेटीच्या ओढीनं शेकडो किलोमीटर पायी चालून पंढरपूरला पोहचलेल्या वारकरी माऊलींना वंदन केलं आहे. बा पांडुरंगाची भक्ती आणि पंढरपूरची पायी वारी ही महाराष्ट्राची शेकडो वर्षांची गौरवशाली आध्यात्मिक, संतपरंपरा, भक्तीपरंपरा आहे. सर्व जाती, धर्म, पंथांच्या भक्त माऊलींना एकत्र आणणारी, स्त्री-पुरुष समानतेचं दर्शन घडवणारी, महाराष्ट्राच्या मातीला आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिकदृष्ट्या समृद्ध करणारी पांडुरंगभक्तीची, आषाढीवारीची ही पताका अशीच डौलानं उंच फडकत राहूदे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यातील जनतेला, वारकरी माऊलींना, समस्त पांडुरंग भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आषाढी एकादशीच्या निमित्तानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बा पांडुरंगाकडे, "राज्यात पाऊसपाणी चांगलं होऊदे. शेतकऱ्यांच्या शिवारात पिकांची, घरात धनधान्याची, दुधदुभत्याची समृद्धी येऊदे. सर्वांना उत्तम आरोग्य लाभूदे. महाराष्ट्र महागाई, बेरोजगारी, जातीय-धार्मिक दंगलींपासून मुक्त होऊदे. अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी-परंपरांपासून महाराष्ट्राला दूर ठेव. सर्व जाती, धर्म, पंथांच्या नागरिकांमधली एकजूट कायम ठेवून महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्याची ताकद आम्हा सर्वांना दे," असं साकडंही घातलं आहे.
आषाढी एकदशीनिमित्त बा पांडुरंगाला, वारकरी माऊलींना विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून वंदन
|