बातम्या
प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील यांना ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’
By nisha patil - 8/30/2023 5:49:10 PM
Share This News:
प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील यांना
‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी १८ वा स्थापना दिवस
कोल्हापूर /प्रतिनिधी कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२३-२४ साठीचा "डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार" स्त्री शिक्षणासाठी भरीव योगदान देणारे ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कमला कॉलेजचे संस्थापक प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांना जाहीर झाला आहे. शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी विद्यापीठाच्या १८ व्या स्थापना दिनी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील व डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत, डी. वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष माजी मंत्री आमदार सतेज डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय डी. पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी दिली.
१ सप्टेंबर २००५ रोजी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना झाली. शुक्रवारी विद्यापीठाचा १८ व्या स्थापना दिनी सकाळी ९.४५ वाजता विद्यापीठ प्रांगणात ध्वजवंदन व ध्वजगीत होणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता विद्यापीठ सभागृहात पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. यावेळी जीवन गौरव पुरस्कारासह, आदर्श शिक्षक, आदर्श सेवक, गुणवंत विद्यार्थी असे विविध पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी दिली.
मुलींच्या शिक्षणासाठी व त्यांच्या सक्षमीकरणासाठी स्व. डॉ. व्ही. टी. पाटील यांनी स्थापन केलेल्या ताराराणी विद्यापीठ व कमला कॉलेजचे नाव अधिकच उंचीवर नेण्याचे काम डॉ. क्रातीकुमार पाटील करत आहे. कोल्हापूरधील महिलासाठीचे एकमेव महाविद्यालय अशी कमला कॉलेजची ओळख आहे. डॉ. व्ही. टी. पाटील यांनी लावलेल्या या रोपट्याचे डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी विशाल वृक्षात रुपांतर केले आहे. तब्बल ४६ वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या डॉ. पाटील यांनी कमला कॉलेजच्या स्थापनेपासून म्हणजे १९८४ पासून २०१६ पर्यंत प्राचार्यपदाची धुरा सांभाळली.
डॉ. पाटील यांनी कमला कॉलेजमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच मुलींसाठी फॅशनपासून योगापर्यंत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केले. आर्थिक परिस्थिती, विवाह व अन्य कौटुंबिक कारणामुळे मुलींचे शिक्षण थांबू नये यासाठी त्यांनी मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरु केले. मुलींच्या सुरक्षिततेची काळजी घेत त्यांच्यासाठी विद्यापीठ आवारातच वसतीगृहे उभारली. मुलींसाठी खास स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले. मुली शिकून स्वावलंबी बनल्या पाहिजे त्यासाठी ते सतत नवनवीन उपक्रम राबवत असतात. उषाराजे हायस्कूल, प्रिन्स शिवाजी विद्यालय, बाल भवन, कुमार भवन – कडगाव, डी. एड कॉलेज आदी संस्थांच्या माध्यमातून डॉ. पाटील यांचे शैक्षणिक कार्य जोमाने सुरु आहे.
कमला कॉलेजचे संस्थापक प्राचार्य व ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत असताना जिल्हा व राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोठे योगदान दिले. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद, व्यवस्थापन समितीवर त्यांनी प्रभावीपणे काम केले. शिवाजी विद्यापीठाच्या प्राचार्य संघटनेचे अध्यक्षपद गेली अनेक वर्षे ते सक्षमपणे सांभाळत आहेत. महाराष्ट्र राज्य महाविद्यालय प्राचार्य संघटनेचे सेक्रेटरी जनरल म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर विविध शासकीय समित्या, शैक्षणिक समित्या यावर सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. शिक्षण क्षेत्रासाठी विशेषतः स्त्री शिक्षणासाठी सदैव आग्रही असलेल्या डॉ. क्रांतीकुमार पाटील यांची यावर्षीच्या डॉ. डी वाय पाटील जीवन गौरव पुरस्कारांसाठी त्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती डॉ. मुदगल व डॉ. भोसले यांनी दिली.
प्राचार्य डॉ.क्रांतीकुमार पाटील यांना ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव’
|