बातम्या

पुण्यातून चक्क टोमॅटोची चोरी

Tomato theft from Pune


By nisha patil - 7/20/2023 6:39:45 PM
Share This News:



पुण्यातून चक्क टोमॅटोची चोरी

 आतापर्यंत आपल्यातील अनेकांनी वेगवेगळ्या  मौल्यवाण वस्तू चोरी गेल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र आता चक्क सोन्याची किंमत असलेले टोमॅटो चोरी गेल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडे आश्चर्य  व्यक्त केलं जात आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील एका शेतकऱ्याचे विक्रीला नेण्यासाठी तोडून ठेवलेले टोमॅटोचे 20 कॅरेट चक्क चोरांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.शिरूर तालुक्यातील पिंपरी खेड येथील शेतकरी अरुण बाळू ढोमे यांनी टोमॅटो तोडून विकण्यासाठी कॅरेटमध्ये ठेवले होते. अंदाजे 40 हजार रुपये किमतीचे टोमॅटो चोरीला गेले. या प्रकरणी हाजी पोलीस दूरक्षेत्र येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार  दाखल करण्यात आली आहे. ढोमे यांनी मोठ्या हिमतीने टोमॅटो पिकाची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी तोडणीलादेखील पैसे लावले. त्यानंतर त्यांनी बाजारात विकण्यासाठी नेण्यासाठी रात्री अकरा वाजेच्या सुमारास ढोमे हे गाडी आणि कॅरेट व्यवस्थितरित्या लावल्याची खात्री करून झोपले होते.

मात्र दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर गाडीत टोमॅटो भरलेले कॅरेट गायब झाले होते. हे पाहून त्यांना धक्का बसला. या प्रकाराची त्यांनी पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि  घटनेचा तपास करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी  शिरूर तालुक्यातील बेट भागातील जांबूत, पिंपरखेड, चांडोह, फाकटे, शरदवाडी आदि परिसरातून शेतकऱ्यांशी निगडीत कृषीपंप, ठिबकसंच, केबलचोरी, कृषीयंत्र चोरी अशा स्वरूपाच्या अनेक चोरीच्या घटना घडलेल्या आहे. 

मे महिन्यात टोमॅटोला भाव मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. परिणामी त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीचं धाडस केलं नाही. मागील पिकांचं नुकसान अजूनही भरुन निघालं नाही आहे. मात्र तरीही अनेक शेतकऱ्यांनी धाडस करुन टोमॅटोची लागवड केली आणि आता टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी लखपती आणि करोडपती झाले आहे. जुन्नरमधील तुकाराम गायकर या  शेतकऱ्यांने18 एकरात टोमॅटोची लागवड केली होती. ते टोमॅटोंमुळे करोडपती झाले आहेत.


पुण्यातून चक्क टोमॅटोची चोरी