बातम्या
राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू
By nisha patil - 11/8/2023 4:05:17 PM
Share This News:
कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) सध्या पावसाचा जोर कमी असल्याने पंचगंगा नदी पातळीत घट झाली असून गेली 24 दिवस पाण्याखाली असलेल्या राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली.
कसबा बावडा येथील पंचगंगा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा राजाराम बंधारा हा निगवे, वडणगे, चिखली, आंबेवाडी येथील नागरिक तसेच शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कर्मचाऱ्यांसाठी जवळचा मार्ग समजला जातो. पंचगंगेला आलेल्या पूर परिस्थितीमुळे गेली 24 दिवस हा बंधारा पाण्याखाली होता. त्यामुळे वडणगे, निगवे, आंबेवाडी, चिखली येथील कामगारांना शिरोली एमआयडीसी कडे जाण्यासाठी शिवाजी पुलाचा वापर करून अवघे दहा किलोमीटरचे जास्तीचे अंतर लागत होते.
दरम्यान गेली काही दिवस पावसाचा जोर कमी झाल्याने पंचगंगा नदी पातळीत घट होऊन राजाराम बंधाऱ्यावरील पुराचे पाणी ओसरले आहे. पुराच्या पाण्यातून वाहून आलेली लाकडे, झुडपे काढण्याचे काम महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पूर्ण झाले असून बंधाऱ्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून पूर्ववत सुरू झाली आहे.
राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू
|