बातम्या

हिंदी ,मराठी आणि उर्दू भाषेच्या त्रिवेणी संगम कवी संमेलनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

Triveni Sangam Kavi Sammel of Hindi


By Administrator - 9/20/2023 1:56:07 PM
Share This News:



इचलकरंजी: प्रतिनिधी  शहराच्या पाणी प्रश्नापासून ते गझल निर्मितीपर्यंत आणि महाविद्यालयीन जीवनातील प्रेम  ते जातीपातीच्या भिंतीवर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कविता येथील आपटे वाचन  मंदिरामध्ये सादर झाल्या. निमित्त होते त्रैमासिक कवी संमेलनाचे. हिंदी दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या काव्य संमेलनात अनेक कवींच्या बरोबरच पोलीस उपाधीक्षक समिरसिंह साळवे यांनीही सादर केलेल्या कवितांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

इचलकरंजी येथील शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या  आपटे वाचन मंदिरच्या वतीने हिंदी मराठी आणि उर्दू भाषेच्या त्रिवेणी संगमाचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.या कवी संमेलनाचे उद्घाटन इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या हस्ते झाले,तर अध्यक्षस्थानी गझलकार व कवी प्रसाद कुलकर्णी हे होते.
इचलकरंजी शहर आणि पाणी प्रश्न हा एक ज्वलंत विषय बनला आहे. शहराच्या अनेक सार्वजनिक कार्यक्रमात इचलकरंजीचा पाणी प्रश्न प्रामुख्याने पुढे येतोच. त्याची प्रचिती चक्क कवी संमेलनामध्ये सुद्धा आली.

 

"पाणी हाय आज पिते है! पाणी है आज,तो हमारा कल है! इसको पीते ही वजू करते है गंगाजल है! कोई कहता है, कोई है चुपी साधे!राजकरतो का सियासत का सहारा जल है! या इरफान शाहूनुरी यांच्या कवितेला उपस्थित रसिकांनी प्रचंड दाद दिली. इचलकरंजीचे युवा कवी रोहित शिंगे यांनीही सादर केलेल्या कवितांना उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यांना माहीत नाही काल कविता माझ्याकडे वस्तीला होती, सखी आली माहेरी झाली नजरा नजर, तुझे माहेरी येणे हिचा चेहरा पडला, अशा प्रेम कवितांनी  कवी संमेलनात एक वेगळीच रंगत आली.
 

महाविद्यालयीन जीवनापासूनच मी कविता करतो असे सांगत पोलीस उपधीक्षक समरसिंह साळवे यांनीही  कविता सादर केल्या. डोळ्यांमध्ये मेघ अचानक दाटून गेले एक पाखरू आभाळाला चाटून गेले,  तुझ्या डोळ्यांच्या कड्यांनी साद मजला घातली, या कवितांनी कॉलेज जीवनातील आठवणी त्यांनी सांगितल्या. धुंद झाली चंद्र तारे, मी भटकत राहतो वाट शोधत राहतो  साहित्याच्या जंगलात या वेगळ्या कविताही त्यांनी सादर केल्या.  प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका गौरी पाटील यांनी झुटी  शान बनकर ना बन अभिमान, जात-पातसे मत हो अंधा या कवितेने समाजातील सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकला. अभिनेत्री म्हणून काम करताना आलेल्या अनेक आठवणीही त्यांनी सांगितल्या .या काव्य संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, प्रा.सुजित सौंदत्तीकर, इब्राहिम लक्षमेश्वर, संतोष साधले, मुकुल व्याकुल यांनीही अनेक आशयपूर्ण कविता सादर केल्या.
सुरुवातीला उद्घाटनपर भाषणात आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आपटी वाचन मंदिराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. संपूर्ण काव्य संमेलनाचा आस्वाद त्यांनी घेतला. स्वागत वाचनालयाचे अध्यक्ष सौ. सुषमा दातार तर प्रास्ताविक कार्यवाह माया कुलकर्णी यांनी केले. आभार संस्थेच्या उपाध्यक्ष सौ हर्षदा मराठे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाचनालयाचे संचालक राजेंद्र घोडके यांनी केले. आपटे  वाचन मंदिराच्या बजाज सभागृहात झालेल्या या संमेलनास सहकार्यवाह डॉ.कुबेर मगदूम,संचालक बाळासाहेब कलागते,अशोक केसरकर,बापू तारदाळकर प्रा.मोहन पुजारी,मीनाक्षी तंगडी यांच्यासह रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.


हिंदी ,मराठी आणि उर्दू भाषेच्या त्रिवेणी संगम कवी संमेलनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद