बातम्या

लहान मुले पळवून नेणारे समजून दोन भिक्षूकांना पकडले!

Two monks were caught as child abductors


By nisha patil - 5/13/2024 6:31:22 PM
Share This News:



कोल्हापूर : प्रतिनिधी कोल्हापूरात गजबजलेल्या चौकात भगवी वेशभूषा परिधान करून भिक्षा मागणाऱ्या दोघा भिक्षेकर्‍यांना लहान मुले पळवून नेत असल्याच्या गैरसमजुतीतून पकडण्याचा प्रकार आज दुपारी साडेबारा वाजता लॉ कॉलेज चौकात घडला. शाहूपुरी पोलिसांनी त्या दोघा भिक्षेकर्‍यांना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता हा सगळा प्रकार गैरसमजुतीतून घडला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

राजारामपुरी पाचवी गल्ली परिसरात राहणारा एक तेरा वर्षीय मुलगा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लॉ कॉलेज चौकात आपल्या मित्राच्या दुकानात बसला होता. यावेळी या परिसरातून भगवी वस्त्र परिधान केलेले दोन भिक्षेकरी चालले होते. यावेळी या परिसरातील रिक्षा व्यवसायिक मनोहर इंगवले यांना हे भिक्षेकरी मुलांना पळवून नेत असल्याचा संशय आला. यातून त्यांनी आरडाओरड केल्यानंतर या ठिकाणी मोठा जमाव जमा झाला. जमावानं या दोन भिक्षेकर्‍यांना पकडून ठेवलं. याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित दोन भिक्षेकर्‍यांना पोलीस ठाण्यात आणलं. समीर जोगी आणि सोहेल जोगी अशी त्या दोघांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी आपण मूळचे उत्तर प्रदेशचे असून सध्या मिरज येथे राहत आहे. कोल्हापुरात येऊन दररोज भिक्षा गोळा करून उदरनिर्वाह करत असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली यामध्ये काही आक्षेपार्ह असं आढळून आलेलं नाहीय. पोलिसांकडून त्या दोघा भिक्षेकर्‍यांची आणि कुटुंबीयांची अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार गैरसमजुतीतून घडला असून याप्रकरणी आपण पुढील तपास करीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.


लहान मुले पळवून नेणारे समजून दोन भिक्षूकांना पकडले!