राजकीय
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे लवकरच तुरुंगात जातील- नारायण राणे
By nisha patil - 6/27/2023 1:24:26 PM
Share This News:
राजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने कोकण विकासासाठी भरीव निधी दिला.मात्र, गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यासह कोकणासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने काय दिले, असा प्रश्न उपस्थित करत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कोकणामध्ये उद्धव ठाकरे यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगामध्ये प्रगतिशील देश म्हणून नावारूपास येत असून मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत सा-यांनी साथ देण्याचे आवाहनही केले.
शिवसेनेवर (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जोरदार टीका करताना आगामी काळामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत लवकरच तुरुंगात जातील असे सूतोवाच केले. गेल्या नऊ वर्षांमध्ये झालेला विकास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी महासंपर्क अभियान राबविण्यात येत असून राजापूर हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या जाहीर सभेमध्ये राणे यांनी ठाकरेंवर प्रहार केला.
व्यासपीठावर त्यांच्यासह सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार आशिष शेलार, अभियान राज्य प्रभारी आमदार प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष ऍड. दीपक पटवर्धन, राजन तेली, बाळ माने, अनिकेत पटवर्धन, शिल्पा मराठे, उल्का विश्वासराव आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘‘केंद्रातील तत्कालीन सत्ताधारी काँग्रेसच्या काळात जो विकास झाला नाही तो विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांमध्ये केला आहे. मात्र मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यासह कोकण विकासासाठी नेमके काय केले, राज्याचे कोणते विकासात्मक प्रश्न सोडविले, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या स्वबळातील बळ गेले असून शिवसेना आता संपलेली आहे.
त्याचा जास्त विचार करू नका. त्यांच्यासोबत असलेले खासदार आणि आमदारही आगामी निवडणुकीत त्यांच्यासोबत राहणार नाहीत. लोकांना आता भाजपची गरज असून समाजातील सर्व घटकांसह तळागाळामध्ये मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास पोहोचवा.’’
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे लवकरच तुरुंगात जातील- नारायण राणे
|