बातम्या

कासारी नदीत छकड्यासह वाहून गेल्याने बैलजोडीचा दुर्दैवी अंत

Unfortunate end of the bullock pair after being washed away with the stick in the river Kasari


By nisha patil - 7/25/2023 6:49:40 PM
Share This News:



 कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात पूर आलेल्या कासारी नदीत छकड्यासह वाहून गेल्याने  बैलजोडीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे बंधाऱ्याजवळ ही घटना घडली. बंधाऱ्यावर महाडिकवाडीमधील बैलजोडीचे मालक महादेव माने थांबल्यानंतर येजा करणाऱ्या वाहनांना पाहून बैलजोडी बुजली. बुजल्याने छकड्यासह बोलजोडीने पुराच्या पाण्यात उडी घेतली. त्यामुळे मानेवर छकडा बांधलेला असल्याने पुराच्या पाण्यात दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही बैलाचा दुर्दैवी शेवट झाल्याने शेतकऱ्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या बैलजोडीला पाण्यातून बाहेर काढले. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. नद्या इशारा पातळीवरून वाहत आहेत. असे असतानाच ही पन्हाळा तालुक्यात बैलजोडी वाहून जाण्याची घटना घडली. कोल्हापूर जिल्ह्यातील पशुधनाची जिवितहानी होऊ नये, यासाठी पुरबाधित गावामधील लोकांना पशूधनासह स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुराच्या पाण्यात पशुधन वाहून गेल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रयाग चिखल येथील 80 जनावरे आणि 125 लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. 

दरम्यान, पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागल्याने नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. महापुराच्या जुन्या आणि कटू आठवणी गेल्या नसल्याने प्रशासनाकडून पंचगंगा इशारा पातळीवर वाहू लागल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सर्वाधिक फटका बसणाऱ्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी आणि चिखलीमध्ये स्थलांतर सुरु करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर शहरातील पूरबाधित भागांमध्येही स्थलांतर सुरु करण्यात आले आहे. शहरातील पुरबाधित भाग असलेल्या तावडे हाॅटेल परिसरातील कुंटुंबाचे मनपा प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले आहे.

सततच्या पावसाने विविध नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीचे 83 बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे थेट संपर्क तुटल्याने वाहतूक अन्य मार्गाने सुरु आहे. गगनबावडा तालुक्यातील लोंघे, मांडुकली येथे पाणी आल्यामुळे या मार्गावरील गोवा, पणजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोकणातील वाहतूक बंद झाली आहे. फोंडा घाटमार्गे पर्यायी वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील 24 पैकी 15 राज्य मार्ग आणि 122 पैकी 51 प्रमुख जिल्हा मार्ग बंद झाले आहेत. या सर्व मार्गांवर वाहतूक बंद आहे. या मार्गावरून गावांना जोडणारे सुमारे चारशेहून अधिक  गावांचा संपर्क तुटला आहे. मात्र, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.


कासारी नदीत छकड्यासह वाहून गेल्याने बैलजोडीचा दुर्दैवी अंत