बातम्या

इचलकरंजीत रेस्क्यू टीम सदस्यांचे अनोखे रक्षाबंधन

Unique defense of Ichalkaranjit rescue team members


By nisha patil - 4/9/2023 5:28:54 PM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी एरवी महापूर अथवा तशाच कोणत्याही प्रकारच्या आपत्ती आल्या तर ज्यांना आपण मदतीसाठी बोलावून घेतो व ते धावून येतात, अशा इचलकरंजी मधील विविध रेस्क्यू टीमच्या सदस्यांना आवर्जून बोलावून रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल ॲनस कमिटीच्या महिला सदस्यांनी त्यांचा रक्षाबंधन उपक्रम संपन्न केला. या कार्यक्रमात इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आधार फौंडेशन, पोलिस बॉईज, सर्पमित्र टीम, तेजोनिधी रेस्क्यू फोर्स आणि वीर रेस्क्यू फोर्स या संघटनांच्या तीस सदस्यांचे रक्षाबंधन करण्यात आले.
 

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या या नात्याने सौ. वैशाली आवाडे  उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी "बहिण भावाचे नाते हे भारतीय संस्कृतीमधील एक भावपूर्ण नाते असून या नात्याला उजाळा देण्यासाठी रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा केला जातो आणि या निमित्ताने बहिण भाऊ या दोघांकडून एकमेकांना मिळणारे प्रेम आणि प्रोत्साहन त्यांच्या आयुष्याला उभारी देणारे ठरत असते , अशा आशयाचे उदगार काढले. तत्पूर्वी ॲनस कमिटीच्या महिला सदस्यांनी सर्व रेस्क्यू टीम सदस्यांना ओवाळून आणि कुंकुम तिलक लावून रक्षाबंधन केले. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सर्व रेस्क्यू टीम सदस्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली. 
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चेअरमन सौ. यास्मिन कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर सौ. शीतल धड्ड यांच्या हस्ते पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लब सेंट्रलचे उपाध्यक्ष घनश्याम सावलानी आणि सेक्रेटरी सुरेश रोजे उपस्थित होते. याप्रसंगी सदरच्या उपक्रमास सहकार्य करणारे राजकुमार थोरवत यांनी शुभेच्छा मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर रेस्क्यू टीमच्या वतीने संजय कांबळे आणि सतीश चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी रेस्क्यू टीमच्या अनेक सदस्यांनी "बहिणीच्या नात्याने बोलवून आमचा एक प्रकारे सन्मान केला. अडचणीच्या वेळी आम्हाला बोलावले जाते, पण सणाच्या निमित्ताने रक्षाबंधनासाठी बोलावले ही  आपुलकीची गोष्ट आहे" अशा भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सायली होगाडे यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन सौ. सायली बंब यांनी केले. येथील रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास रोटरी सदस्य तसेच महिला सदस्या उपस्थित होत्या.


इचलकरंजीत रेस्क्यू टीम सदस्यांचे अनोखे रक्षाबंधन