बातम्या
कोल्हापूर लोकशाही दौडच्या संदेशमय टी-शर्टचे अनावरण
By nisha patil - 1/4/2024 7:24:18 AM
Share This News:
मतदार जनजागृतीच्या अनुषंगाने रन फॉर वोट लोकशाही दौडचे आयोजन दि.७ एप्रिल रोजी करण्यात आले असून यामध्ये जिल्हयातील मतदार विद्यार्थी, नागरिक यांच्यासह शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी सहभाग घेणार आहेत. या दौडमधे देण्यात येणा-या संदेशमय टी-शर्टचे अनावरण जिल्हाधिकारी आमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांचेतर्फे स्वीप अंतर्गत आयोजित केलेल्या दौडचे “चला धावूया – सुदृढ आरोग्यासाठी, मतदान करूया बळकट लोकशाहीसाठी” हे ब्रीद वाक्य आहे. या ब्रीदवाक्यासह ‘मी मतदान करणारच’ अशा विविध संदेशांचा समावेश केलेल्या टीशर्टचे आनावरण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, स्वीपचे नोडल अधिकारी निलकंठ करे, सहायक नोडल वर्षा परिट, सिनेकलाकार आनंद काळे, कोल्हापूर स्पोर्ट क्लबचे चेतन चव्हाण, विजय कुलकर्णी, आकाश कोरगावकर, डॉ.प्रदिप पाटील, संजय पाटील, गोरख माळी, आशिष तंबाके, उत्तम फराकटे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बघा आबा, कोल्हापूर दर्शन व कोल्हापूर सर्वेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
पोलीस मैदान, कसबा बावडा येथे ७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता सर्व सहभागी एकत्र जमणार असून ६.३० वा. १० किमी त्यानंतर ६.४० वाजता ५ किमी तर ६.५० वा. ३ किमीसाठी धावणारे धावतील. सर्वच सहभागींनी दि.७ एप्रिल रोजी सकाळी ६ वा मैदानावर उपस्थित असणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हयामधील मतदारांनी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये सार्वत्रिक लोकसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हयातील सर्व नागरिकांना या दौडमधून संदेश देण्यात येणार आहे. या दौडमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे गुगल फॉर्म उपलब्ध करुन दिलेला असून आता निःशुल्क नोंदणीसाठी २ एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी https://forms.gle/ZjEeU27NYRwoVQ6J9 या लिंकवरती इच्छुक नि:शुल्क नोंदणी करु शकतील. आत्तापर्यंत जवळपास तीन हजार जणांनी या दौडमधे सहभाग नोंदविला आहे.
जागतिक आरोग्यदिनी आरोग्याचा संदेश देण्याबरोबरच लोकशही उत्सवातील मतदान प्रक्रियेमधे सहभागी होण्यासाठी या दौडमधून संदेश दिला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या दौडमधे कोल्हापूर येथे पोलीस मैदानावर उपस्थित रहावे. शहराबाहेरील नागरिकांनी त्या त्या ठिकाणी दौडमधे सहभाग घेवून मतदान करण्याचा संदेश सर्व मतदारांना द्यावा. कोल्हापूर जिल्हयात दि.७ मे रोजी मोठ्या संख्येने मतदान करून कोल्हापूर जिल्हयाची मतदान टक्केवारी वाढवून लोकशाहीच्या उत्सवात सहभाग नोंदवून ती अधिक बळकट करावी असेही त्यांनी यावेळी आवाहन केले.
कोल्हापूर लोकशाही दौडच्या संदेशमय टी-शर्टचे अनावरण
|