बातम्या
लाईन बाजार हॉकी मैदानासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा : श्री.राजेश क्षीरसागर
By nisha patil - 12/6/2024 6:26:13 PM
Share This News:
लाईन बाजार हॉकी मैदानासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा : श्री.राजेश क्षीरसागर
उर्वरित कामांसाठी रु.३.७५ कोटींचा निधी तातडीने देणार; लाईन बझार हॉकी मैदानाची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
कोल्हापूर दि.१२: कोल्हापूर ही कलेसह क्रिडानगरी म्हणून ओळखली जाते. कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या अनेक नामवंत खेळाडूंनी आप-आपल्या क्रिडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करत कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. फुटबॉल, क्रिकेट सह देशाचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकी खेळावरही कोल्हापूरकरांचे विशेष प्रेम आहे. त्यामुळेच कोल्हापुरातून अनेक हॉकी खेळाडूही राष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत. गेल्या काही वर्षात हॉकीसाठी उपलब्ध असणारे लाईन बझार येथील मैदानाची दुरावस्था झाल्याने खेळाडूंच्या सरावावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे तात्काळ या मैदानाचे नूतनीकरण करून आवश्यक सोयी सुविधा खेळाडूंना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पहिल्या टप्प्यात या मैदानाच्या विकासासाठी मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी मुलभूत सोयी सुविधा निधीतून रु.१ कोटी ७५ लाखांचा निधी दिला आहे. याच्या पुढील टप्प्यात या मैदानात टर्फ विथ शॉक पॅड बसविण्यासाठी रु.३ कोटी ७५ लाखांचा निधी आवश्यक असून, याचा आराखडा तयार करून प्रस्ताव आजच्या आज शासनाकडे सादर करावा. तात्काळ राज्य शासनाकडून यास मंजुरी घेवून निधी उपलब्ध करून देवू, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
कसबा बावडा येथील लाईन बझार हॉकी मैदानाची आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली. यावेळी रु.१ कोटी ७५ लाखांच्या निधीतून झालेल्या कामाची माहिती श्री.क्षीरसागर यांनी घेतली. यासह नव्याने कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबतच्या सूचना मनपा अधिकाऱ्यांना दिल्या. यासह आवश्यक निधीचा प्रस्ताव आजच्या आज शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी, स्वातंत्र्यपूर्व काळापासून लाईन बझारात हॉकी खेळली जात आहे. आज घरोघरी एक हॉकीचा खेळाडू आहे. या खेळाच्या जोरावर अनेक तरुणांना पोलीस, रेल्वे, शिक्षण, बँका, सहकारी संस्था अशा अनेक क्षेत्रांत नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. अनेक खेळाडू जिल्हा, राज्य व देश पातळीवर चमकले आहेत. पण केवळ टर्फ मैदानावरील सराव नसल्याने येथील खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकू शकले नाहीत. याची खंत येथील खेळाडू, प्रशिक्षक व हॉकी शौकिनांच्या मनात आजही घर करून आहे. कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचा विकास व्हावा. येथून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. कोल्हापूरच्या फुटबॉलसाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल अॅकॅडमीसाठी विशेष प्रयत्न सुरु आहेत. छत्रपती शिवाजी स्टेडियमला उर्जितावस्था देवून क्रिकेट खेळाला प्राधान्य दिले जात आहे. यासह या हॉकी मैदानाचा कायापालट करून हॉकी खेळासही विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. याठिकाणी खेळाडूंच्या सरावाच्या दृष्टीने आवश्यक बाबी तात्काळ उपलब्ध करण्यात येणार आहेत. यासह पुढील टप्प्यात प्रेक्षक गॅलरी, विद्युतीकरण यातून मैदानाचा कायापालट झालेला दिसेल, अशी ग्वाही दिली.
यावेळी मनपा शहरअभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे, शिवसेना समन्वयक सुनील जाधव, रोहन उलपे, कृष्णा लोंढे, सचिन पाटील, आदर्श जाधव, आकाश चौगले, अमित कांबळे, जय लाड आदी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाईन बाजार हॉकी मैदानासाठी आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करा : श्री.राजेश क्षीरसागर
|