बातम्या

101 कोटीच्या मंजूर निधीतून विविध विकास कामे लवकरच सुरु - प्रकाश आवाडे

Various development works will start soon from sanctioned funds of 101 crore  Prakash Awade


By nisha patil - 6/17/2023 11:22:15 PM
Share This News:



इचलकरंजी: प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानेच इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात 101 कोटी रुपयांच्या मंजूर निधीतून प्रस्तावित कामे लवकरच सुरु होतील , अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.तसेच यामध्ये 
64 कोटी खर्चाचे रस्ते डांबरीकरण ,6 कोटी 10 लाख रुपये खर्चाचे छोटे छोटे पुल, 22 कोटींचे पाणंद रस्ते आदींचा समावेश आहे , असेही ते म्हणाले.
 
अधिक माहिती देताना आम. प्रकाश आवाडे म्हणाले ,ऑगस्ट महिन्यात शहरातील विविध डांबरीकरणाचा 64 कोटीचा प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमोर दाखल केला होता. त्यास मान्यता मिळाली असून 179 कामे असणारा प्रस्ताव 
शासनाच्या नगर विकास विभागाकडे पाठवला आणि त्यास मंजुरी मिळाली. तसेच शहरातील छोटे पूल यामध्ये बोहरा मार्केट, आरगे भवन परिसर, कंजारभाट वसाहत, निरामय हॉस्पिटल, शहापूर स्मशानभूमी, आमराई ज्ञानेश्वर मंदिर लगत नवीन पूल बांधणीचे अंदाजपत्रकही शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले. याचा अंदाजे खर्च 6 कोटी दहा लाख रुपये असून यास मान्यता मिळाली आहे. तर गेली 40 वर्षे पाणंद रस्ते होऊ शकले नव्हते , याचाही पाठपुरावा करून 22 कोटी 77 लाख रुपयांच्या 14 ठिकाणच्या रस्त्यांना मंजुरी मिळाली असून लवकरच निधी प्राप्त होईल , असेही आम.आवाडे यांनी सांगितले.
तसेच तीन बत्ती चार रस्ता रुंदीकरणासाठी 6 कोटी 41 लाखांचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासनाकडे पाठवला असून तेही काम लवकरच सुरू होईल. तसेच कचरा डेपोवरील कचरा हटवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापना अंतर्गत टेंडर काढावे , यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना सहा पत्रे पाठवली. तरी अद्याप त्यांनी टेंडर न काढल्याने कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित राहिला आहे ,असा आरोपही आमदार प्रकाश आवाडे यांनी केला. पाणी प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की , शहरात विविध ठिकाणी सहा जलकुंभ बांधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर विषय आला.यावर त्यांनी प्रस्ताव पाठवा म्हणाले. पण आयुक्तांनी अद्याप याकडे दुर्लक्ष केल्याने या कामाला गती मिळत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
  तसेच महानगरपालिकेने घरफाळा व अन्य सुविधेमध्ये वाढ केली. त्याबाबत आपण विरोध केला. आयुक्तांनी वाढ रद्द करतो ,असे स्पष्ट केले असले तरी अद्याप ती झालेली नाही. याबरोबरच शहरातील 99 ठिकाणी उभारलेला शुद्ध पेयजल प्रकल्प अद्याप चालू न झाल्याने पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागतो. तसेच यशोदा पुलाच्या कमानीचे काम पंधरा दिवसात सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील पाच गावातील सारण गटार व रस्ते मजबुतीसाठीचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी असून यातून 35 कोटी रुपयांची कामे अपेक्षित आहेत. नुकतेच शासनाने वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले यातील काही शंका, कुशंका असतील तर त्या चर्चासत्राद्वारे मांडण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आम. यांनी सांगितले. त्याबरोबरच कामगार मंत्री यांच्याकडे कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यासाठी बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासनही आवडे यांनी दिले. 
 यावेळी ताराराणी पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, बाळासाहेब कलागते, दीपक सुर्वे, अहमद मुजावर, राजु बोंद्रे, संजय केंगार आदी  उपस्थित होते.


101 कोटीच्या मंजूर निधीतून विविध विकास कामे लवकरच सुरु - प्रकाश आवाडे